शहीद जवानांच्या मृतदेहाची पाककडून विटंबना

0

श्रीनगर : पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात आणि रॉकेट लाँचरच्या हल्ल्यात दोन भारतीय जवान सोमवारी शहीद झाले. शहीद झालेल्या जवानांपैकी एक जेसीओ आणि एका सीमा सुरक्षा दलाच्या हेड कॉन्स्टेबलचा समावेश होता. या हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना केल्याचे भारतीय लष्कराने सांगितले. 1 मे रोजी कृष्णा सेक्टरमधील नियंत्रण रेषेजवळ दोन चौक्यांवर पाकिस्तानी सैनिकांनी रॉकेट लाँचरचा मारा केला तसेच गोळीबारही केला. पाकिस्तानी सैनिकांनी भ्याड हल्ला करत भारताच्या दोन जवानांच्या मृतदेहाची विटंबना केल्याचे लष्कराच्या निवेदनात म्हटले आहे. पाकिस्तानच्या या नृशंस कृत्याला चोख प्रत्युत्तर देण्यात येईल, असा इशाराही लष्कराने दिला आहे. सोमवारच्या या हल्ल्यानंतर रात्री उशिरा भारतीय सैनिकांनी केलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या 7 सैनिकांना कंठस्नान घालण्यात आले तसेच पाकच्या दोन चौक्या उद्धवस्त केल्या.

जवान परमजीत सिंह, प्रेम सागर शहीद
पाकिस्तानने भारतीय हद्दीत सुरुंग पसरवल्याची सूचना भारतीय सेनेला मिळाली होती. दरम्यान 10 जवान दोन पोस्टच्यामध्ये पेट्रोलिंग करत असताना सीमेपलीकडून रॉकेट आणि ऑटोमेटिक हत्यारांच्या माध्यमातून गोळीबार करण्यात आला. पुंछमध्ये झालेल्या या हल्ल्यात सैन्याचे जेसीओ नायब सूभेदार परमजीत सिंह आणि बीएसएफचे हेड कॉन्स्टेबल प्रेम सागर शहीद झाले. परमजीत सिंह 1995 पासून देशाच्या सेवेसाठी सैन्यात दाखल झाले होते. तर शहीद प्रेम सागर हे बीएसएफच्या 200 व्या बटालियनमध्ये तैनात होते. ते 1994 मध्ये बीएसएफमध्ये सामील झाले होते. मागील तीन वर्षांपासून ते जम्मूच्या सांबामध्ये तैनात होते.

शहीदांची विटंबना
पाकिस्तानी लष्कराच्या बॉर्डर अक्शन टीमने (बी-टी) भारतीय सीमेत 250 मीटर आत घुसखोरी करत गोळीबार केला. यानंतर भारतीय जवांनाच्या मृतदेहांची विटंबना करत, बीएसएफचे जवान परमजीत आणि प्रेम सागर यांचे शीर धडापासून वेगळे करुन ते घेऊन गेले. बॉर्डर अक्शन टीमच्या 647 मुजाहिद बटालियनने घुसखोरीसाठी पाकिस्तान लष्कराकडून किरपान आणि पिंपल पोस्टमधूर कव्हर फायरिंग केली होती.

भारतीय सैन्याची कारवाई
जम्मू काश्मीरमध्ये पुंछ सेक्टरकच्या कृष्णा खोर्‍यात भारतीय सैन्यावर भ्याड हल्ला करणार्‍या पाकिस्तानला भारताने चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय सैन्याने जोरदार कारवाई करत पाकिस्तानच्या दोन लष्करी छावण्या उद्ध्वस्त केल्या. या कारवाईत पाकिस्तानचे सात सैनिक ठार झाले. पाकिस्तानच्या या दोन्ही लष्करी तळावर 647 मुजाहिद बटालियनचे सुमारे 10 ते 16 सैनिक तैनात होते. सेना आणि बीएसएफच्या कारवाईनंतर भ्याड पाकिस्तानने फायरिंग बंद केली. सोमवारच्या या हल्ल्यापुर्वी पाकिस्तानी सेना प्रमुख कमर जावेद बाजवा रविवारीच ‘एलओसी’दौरा करून गेले होते. यापूर्वीही मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात माच्छिलमध्ये पाकिस्तानी सेनेने एका जवानाच्या मृतदेहाची विटंबना केली होती.

पाकचा पुन्हा कांगावा
पाकिस्तानी सैन्याने हल्लेखोरांना संरक्षण दिल्याचे भारताच्या डीजीएमओंनी म्हटले. मात्र पाकिस्तानने भारताच्या या आरोपांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘नियंत्रण रेषेवर गोळीबार करण्यात आला असेल, तर त्याचे पुरावे द्या,’ असे पाकिस्तानने म्हटले आहे. सोमवारी भारत आणि पाकिस्तानच्या लोकल कमांडर्समध्ये रात्री रावलाकोट-पुंछ सेक्टरमध्ये हॉटलाईनवरुन बातचीत झाली. मंगळवारी इंटर सर्विसेस पब्लिक रिलेशन्सकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला. ‘पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आलेले नाही. पाकिस्तानी सैन्याकडून भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबनादेखील करण्यात आलेली नाही,’ असा पवित्रा पाकिस्तानच्या डीजीएमओंनी घेतला. भारताकडून आणि भारतातल्या प्रसारमाध्यमांकडून विनाकारण पाकिस्तानवर आरोप केले जात आहेत, असा कांगावा पाकने केला आहे.

कुटूंबियांकडून संपुर्ण शरीराची मागणी
पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेले पंजाबचे वीरपुत्र परमजीत सिंह यांना अखेरचा निरोप देण्यात आला. पंजाबमधील तरनतारण या मूळगावी अत्यंत शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पाकिस्तानला जशास तसे उत्तर द्या, अशी मागणी तिथे उपस्थित जनसमुदायाने केली. परमजीत यांचं संपूर्ण शरीर मिळेपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही. मला माझ्या पतीचे संपूर्ण शरीर हवे आहे, अशी भूमिका परमजीत यांच्या पत्नीने घेतली होती. जर शरीर छिन्नविछिन्न झाले आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा मुख्यमंत्री अमरिंदर सिंह भेटायला येणार नाहीत, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, असेही परमजीत सिंह यांच्या पत्नी म्हणाल्या होत्या. अखेर अधिकार्‍यांनी समजूत काढल्यानंतर कुटुंब अंत्यसंस्कार करण्यात आले.

50 पाक सैन्यांची मुंडकी आणा
पाकिस्तानी सैन्याच्या हल्ल्यात वडिलांना वीरमरण आले आहे, याबाबत लष्कराच्या प्रशासनाकडून कोणतीही माहिती मिळाली नाही. माझ्या वडीलांचे हौतात्म्य व्यर्थ जाणार नाही. त्याबदल्यात पाकिस्तानच्या 50 सैन्यांची मुंडकी आणा, अशी मागणी प्रेम सागर यांच्या मुलीने केली. पंजाबमधील नायब सुभेदार परमजित सिंग हेही शहीद झाले आहेत. त्यांच्या मृतदेहाचीही पाकिस्तानी सैन्याकडून विटंबना करण्यात आल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

पुंछमधील नागरिकांकडून पाकचा निषेध
पाक सैनिकांनी भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना केल्याने देशभरात संतप्त पडसाद उमटल. विशेष म्हणजे पुंछ येथे स्थानिक नागरिक आणि लष्करातील निवृत्त सैनिकांनी एकत्र येत पाकिस्तानविरोधात घोषणा दिल्या. देशासाठी प्राण अर्पण केलेल्या जवानांचे पार्थिव घेऊन जात असताना या लोकांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. ‘इंडियन आर्मी आगे बढो, हम तुम्हारे साथ है,’ अशा घोषणा नागरिक देत होते. या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

भारत उत्तर देणार
आमच्या शेजारच्या देशाने कृष्णा खोर्‍यात दोन जवानांना मारुन त्यांची विटंबना केली. हे अमानवी कृत्य आहे. युद्धादरम्यान अशा घटना होत नाहीच, पण शांतीदरम्यानही होत नाहीत. संपूर्ण देशाचा सैन्यावर विश्वास आहे. भारत या हल्ल्याचे चोख उत्तर देईल. शहीदांचे बलिदान वाया जाणार नाही.
-अरूण जेटली, संरक्षणमंत्री

पुर्णवेळ संरक्षण मंत्री द्या
देशाला पूर्णवेळ संरक्षण मंत्री असेल तरच पूर्णवेळ व्यूहरचना आखता येईल. जेव्हा 2013 मध्ये पाकिस्तानने हेमराज या जवानाचे शिर कापले होते. तेव्हा सुषमा स्वराज यांनी या एका बलिदानाच्या बदल्यात 10 शिर आणणार असे म्हटले होते. आता मी पंतप्रधानांना विचारतो की, ते आता या दोघांच्या बलिदानानंतर पाकचे किती शिर आणणार आहेत.
-कपिल सिब्बल, माजी केंद्रीय मंत्री