नवी दिल्ली : दिल्ली युनिव्हर्सिटीच्या रामजस कॉलेजमध्ये विद्यार्थी संघटनांमध्ये झालेली हाणामारी आता अत्यंत हीन पातळीवर गेली असून तिने राजकीय वळण घेतले आहे. विद्यार्थी संघटनांमधील या हिंसेविरोधात सोशल मीडियावर आवाज उठविणारी कारगील युध्दातील शहीदाची मुलगी गुरमेहर हीला ठार मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या दिल्या जात आहेत. लेडी श्रीराम कॉलेजमध्ये शिकणार्या गुरमेहरने कौरने फेसबुकवर एबीव्हीपी या विद्यार्थी संघटनेवर टीका केली होती. आता या आगीत मैसूरचे भाजप खासदार प्रताप सिंह यांनी तेल टाकले आहे. या खासदाराने थेट गुरमेहर या विद्यार्थीनीची तुलना देशद्रोही गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी केली आहे. तसे एक चित्रही त्यांनी सोशल मीडियावर टाकले आहे. प्रताप सिंह यांच्या या प्रतापामुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. दरम्यान एबीव्हीपी या संघटनेच्या प्रेरणा भारव्दाज यांनी म्हटले आहे की, देशद्रोही घोषणाबाजीची घटना खोट्या आरोपांच्या पाठीमागे लपवली जात आहे. तसेच एबीव्हीपीपासून कुणालाही धोका नाही. गुरमेहर कौरने घाबरण्याचे कारण नाही.
बलात्काराची धमकी
विद्यार्थी संघटनांच्या नेत्यांच्या हिसेला विरोध करणार्या गुरमेहर कौरचे म्हणणे आहे की, त्यांच्या विरोधात सोशल मीडियावर कॅम्पेन सुरू केल्याने गुरमेहर आणि तिच्या मैत्रीणींना ठार मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या येत आहेत. गुरमेहर म्हणाली, मला देशद्रोही म्हटले जात असून माझी थट्टा केली आज आहे. हे त्यांनी मला घाबरविण्यासाठी सुरू केले आहे. बुधवारी रामजस कॉलेजच्या कार्यक्रमात जेएनयुचा विद्यार्थी उमर खालिदला वक्ता म्हणून बोलाविण्यात आल्याने एबीव्हीपीच्या विद्यार्थ्यांनी त्यास विरोध केला होता. यावेळी झालेल्या हाणामारीत वीस विद्यार्थी जखमी झाले होते. उमर खालिदवर देशद्रोहाचा आरोप एबीव्हीपीने केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. डीयुची विद्यार्थीनी गुरमेहरने फेसबुकवर 140 शब्दांची पोस्ट टाकली होती. यामध्ये तीने सर्व प्रकरणाची माहिती दिली होती. त्यानंतर गुरमेहरचे कॅम्पेन फेसबुकवर व्हारल झाले आहे. गुरमेहर कौरचे वडील मंदीप सिंह भारतीय सैन्यात कॅप्टन होते. 1999 च्या कारगिल युध्दात ते शहीद झाले. लुधियानात राहणार्या गुरमेहरला राजकारणाचे वावडे नसले तरी तिला लेखक व्हायचे आहे.
सोशल मीडियावर आरोप
एका मोठ्या पोस्टसह गुरमेहरने मी एबीव्हीपीला घाबरत नाही असे लिहीलेला फलक घेतलेला तिचा फोटो प्रोफाईल फोटो म्हणून लावला. तिने या छोट्या फलकावर म्हटले आहे की, मी दिल्ली युनिव्हर्सिटीची विद्यार्थीनी आहे. मी संकुचीत राजकीय विचारांना माझ्या कॉजेलचे कॅम्पस आणि अधिकारांचे अपहरण करू देणार नाही. देशातील प्रत्येक विद्यार्थी माझ्याबरोबर आहे. देशातील हजारो विद्यार्थ्यांनी गुरमेहरला साथ दिली असून तिच्याप्रमाणेच फेसबुकवर आपले प्रोफाईल चित्र बदलले आहे. फेसबुकसह ट्विटर आणि इंस्टाग्रामवर सुध्दा याप्रकरणी हजारो प्रतिक्रिया येत आहेत. तर दुसरीकडे गुरमेहरच्या या सोशल कॅम्पेनच्याविरोधात सुध्दा काहीजण लिहीत आहेत.
युध्द नको शांतता हवी
कारगील युध्दात आपले वडील गमावलेल्या गुरमेहर कौरने आपल्या कॅम्पेनमध्ये युध्दाला विरोध केला आहे. तिने म्हटले आहे, भारत-पाकिस्तानमध्ये मैत्री होऊ शकते. त्यासाठी युध्दाची गरज नाही. माझ्या वडीलांना पाकिस्तानने नव्हे तर युध्दाने मारले आहे. दोन्ही देशात मैत्रीचे संबंध असते तर आज माझे वडील माझ्याबरोबर असते. गुरमेहच्या या पोस्टनंतर क्रिकेटर विरेंद्र सेहवागनेही एक फोटो मेसेजसह सोशल मीडियावर टाकून खळबळ उडवून दिली आहे. यात त्याने म्हटले आहे, तीन सेंच्युरी मी नव्हे माझ्या बॅटने मारल्या आहेत.