शहीद पतीच्या अंत्यविधीत घेतलेली शपथ पूर्ण

0

संतोष महाडिक यांच्या पत्नी भारतीय सैन्यात लेफ्टनंट

चेन्नई : जम्मू – काश्मीरमधील कुपवाडामध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेले सातारा जिल्ह्यातील पोगरवाडीचे सुपुत्र शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून रुजू झाल्या. शहीद पतीच्या अंत्यविधीवेळीच त्यांनी भारतीय सैन्यात जाऊन देशसेवा करण्याचा निर्धार केला होता. ही शपथ त्यांनी खडतर मेहनत घेऊन अखेर पूर्ण केली.

पहिली पोस्टिंग देहूरोड येथे
चेन्नईतल्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीतील कार्यक्रमात स्वाती महाडिक यांनी लेफ्टनंटपदाची शपथ घेतली. या सोहळ्यासाठी महाडिक कुटुंबीयांसह स्वाती यांच्या माहेरचेही नातेवाईक उपस्थित होते. गेल्या अकरा महिन्यांच्या खडतर प्रशिक्षणानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पुणे येथील देहूरोड येथे होणार आहे. स्वाती यांनी पुणे विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांना सैन्यात भरती होण्यासाठी तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर आणि लष्करप्रमुख जनरल दलबीर सिंह यांनी वयाची अट शिथील केली होती. स्वाती महाडिक या प्रशिक्षणार्थींमध्येही अव्वल राहिल्या. चेन्नई येथे शुक्रवारी प्रशिक्षण तळावर झालेल्या कौतुक सोहळ्यात बेस्ट कॅडेट म्हणून मिळालेले पदक कुटुंबीयांना दाखविताना त्यांच्या भावना अनावर झाल्या.

मुलांनाही सैन्यात भरती करणार
17 नोव्हेंबर 2015 रोजी कुपवाडा येथे 41 राष्ट्रीय राईफल्स बटालियनचे नेतृत्व करताना दहशतवाद्यांच्या हल्ल्यात कर्नल संतोष महाडिक शहीद झाले होते. त्यांच्या या शौर्याबद्दल त्यांना मरणोत्तर शौर्यचक्र पुरस्कारही दिला गेला. शहीद कर्नल संतोष यांच्या अंत्यसंस्कार विधीदरम्यान स्वाती महाडिक यांनी आपण देशसेवेत रुजू होणार असल्याचे जाहीर केले होते. तसेच आपल्या मुलांनाही सैन्यातच भरती करणार असल्याची घोषणा केली होती.