शहीद संदीप जाधव यांच्या पत्नीला मिळणार बँकेत नोकरी

0

औरंगाबाद : जम्मू काश्मीरमध्ये पाक सैनिकांशी लढताना शहीद झालेले जवान संदीप जाधव यांच्या पत्नीला वैद्यनाथ सहकारी बँकेत सामावून घेण्यात येणार असल्याचे ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर केले आहे. नाईक संदीप जाधव गेल्या 15 वर्षांपासून लष्कराच्या सेवेत होते. नुकतेच त्यांना वीरमरण प्राप्त झाले. त्यांच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी ना. मुंडे यांनी पुढाकार घेतला असून यापार्श्‍वभूमीवर बुधवारी शहीद संदीप जाधव यांच्या मुळ गावी केळगाव (ता. सिल्लोड) येथे जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले व त्यांना धीर दिला.

केळगाव हे सैनिकांचे गाव असल्याने गावकर्‍यांनी यावेळी पंकजा मुंडे यांना व्यायामशाळेची मागणी केली. ही मागणी तातडीने मान्य करत त्यांनी 25 लाख रुपयांचा निधी व्यायामशाळेसाठी देणार असल्याचे जाहीर केले. तसेच गावातील शहीद सैनिकांचे स्मारक बांधण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचेही आश्वासन त्यांनी दिले.

शहीद संदीप जाधव यांचा मुलगा शिवेंद्र व 3 वर्षांची मुलगी मोहिनी यांच्या शिक्षणासाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्यावतीने प्रत्येकी 1 लाख रुपयाची मुदतठेव ठेवण्यात येणार असून शहीद संदीप जाधव यांच्या पत्नीस वैद्यनाथ बँकेत एक जुलैपासून नोकरीत सामावून घेण्यात येईल.
– ना. पंकजा मुंडे यांनी यावेळी दिले.