दत्तात्रय कराळे ; भुसावळात जयंती उत्सव समितीची बैठक
भुसावळ:- ज्या शहरात उत्तम दर्जाचे शिक्षण दिले जाते, शांतता नांदते त्याच शहराचा विकास होतो, असे स्पष्ट मत जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी येथे व्यक्त केले. पोलीस दलाच्या वतीने सोमवारी सायंकाळी रेल्वे रंगभवनात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.
अफवांचे परीणाम शहरावर होवू देऊ नका
कराळे म्हणाले की, साडेतीनशे वर्षांपूर्वीचे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे स्वप्न होते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पूर्ण केले. आम्ही ज्या व्यासपीठावर बसलो आहेत त्याचे श्रेयदेखील महामानवांना जाते. जयंती तुमची-आमची नाही तर सर्वांची आहे, ती उत्साहात साजरी करा, सोशल मिडीयावर येणार्या पोस्टबाबत विश्वास ठेवू नका, असे आवाहनही त्यांनी केले. इतर कुठल्या शहरांमध्ये अप्रिय घटना दुर्दैवाने घडल्यास त्याचे परीणाम आपल्या शहरावर होवू देऊ नको, असेही त्यांनी सांगितले. शिका, संघटीत व्हा व चुकीच्या कामांसाठी संघर्ष करा, असेही सांगितले.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष लक्ष्मी मकासरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, प्रांताधिकारी अजित थोरबोले, रीपाइं उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, उत्सव समितीचे अध्यक्ष बाळा मोरे, पीआरपीचे महामंत्री जगन सोनवणे, जनआधारचे गटनेता उल्हास पगारे, बाजारपेठ निरीक्षक चंद्रकांत सरोदे, शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक दीपक गंधाले आदींची उपस्थिती होती.
व्यसनमुक्त जयंती साजरी करण्याचे मान्यवरांचे आवाहन
नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले की, उत्सवाच्या दिवशी पालिकेतर्फे सर्व सोयी-सुविधा पुरवण्यात येतील. प्रांत अजित थोरबोले म्हणाले की, तरुणांनी महामानवांच्या विचारावर जगावे, भरकटू नये. शहराला आदर्श गाव बनवावे, सर्व मंडळांनी लोकोपयोगी काम करावे. उत्सव समितीचे अध्यक्ष बाळा मोरे म्हणाले की, शहरातील अनेक ठिकाणी पथदिवे बंद असून ते पालिकेने सुरू करावेत मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवण्याची त्यांनी अपेक्षा व्यक्त केली तसेच जयंती मिरववणुकीत समाज प्रबोधनपर देखावे सादर करण्याचे आवाहन त्यांनी केले व त्यांची उंची 15 फुटांवर नसावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली. पीआरपीचे प्रदेश महामंत्री जगन सोनवणे म्हणाले की, जयंती व्यसनमुक्त पद्धत्तीने साजरी व्हावी. पालिकेच्या डी.एस.ग्राऊंडला महामानवाचे नाव दिल्याने त्याबाबत तसा नाम फलक पालिकेने लावावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. रमेश मकासरे, राजेश्री सुरवाडे, वीज कंपनीचे भंगाळे यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीस शहरातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रकाश लोडते यांनी केले.