अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेला अर्थसंकल्प शुक्रवारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. दुपारी विधानभवनात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे दर्शन घेऊन सुधीरभाऊ विधानभवनात आले अन विरोधकांनी हरिनामाचा गजर करून शांत बसण्याची भूमिका घेतली. महाराजांच्या चरणी लीन होऊन सरकारच्या वतीने सुधीरभाऊंनी माफी मागितली असल्याचा टोला जयंत पाटलांनी लगावला त्याला सुधीरभाऊंनी मागच्या सरकारच्या चुकांची माफी मागितल्याचे सांगत प्रतीवार केला. एक गोष्ट मात्र नक्की कि, गेल्यावर्षी विरोधकांचा अभूतपूर्व गोंधळ सुरु असतानाही ज्या ताकतीने त्यांनी अर्थसंकल्प सादर केला होता तो उत्साह यावेळी दिसून आला नाही. तर दुसरीकडे गेल्यावर्षी शेतकरी कर्जमाफीसाठी अर्थसंकल्पादरम्यान अभूतपूर्व गोंधळ घालणारे विरोधकही शांततेच्या भूमिकेतच दिसून आले. एकूणच यावर्षीच्या अर्थसंकल्पाचे रटाळ प्रस्तुतीकरण झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत होत्या तर विरोधकांनी गेल्यावर्षी सारखे निलंबन होऊ नये या भीतीने शांतच बसण्याची भूमिका घेतली.
भाजप सरकारचे हे तांत्रिकदृष्ट्या शेवटचे बजेट असल्याचे बोलले जात आहे. गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प सादर होत असताना विरोधकांनी टाळ वाजवित माऊलीचा, हरिनामाचा गजर सुरु केला. विठ्ठल नामाचाही अधून मधून गजर करत गणपतीच्या आरत्या आणि घालीन लोटांगणसह शिमग्याच्या बोंबाही मारल्या होत्या. अर्थमत्र्यांचे भाषण सुरु असताना त्यांच्यासमोर बॅनर फडकविले होते. मात्र अर्थमंत्र्यांनी आपले संयमित आणि दणकेबाज भाषण करत गोंधळातही विरोधकांवर टोलेबाजी केली होती. त्यामुळे ९ आमदारांचे निलंबन केले होते. या भीतीने विरोधक यावेळी शांतच बसल्याचे दिसून आले. अर्थसंकल्प सादर करत असताना गेल्या वर्षीच्या तुलनेत कमीच पण काही शेरोशायरीचा वापर सुधीर मुनगंटीवार यांनी केला. अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांवरील एक कविता सादर केली तेंव्हा विरोधकांनी बोंडअळी, बोंडअळी असे म्हणत आरोळी ठोकली. पहिला भाग झाल्यावर मुनगंटीवार यांनी एक शेर मारला त्यावेळी माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी उभे राहत बोलण्याची परवानगी मागितली मात्र त्यावेळी सत्ताधारी आमदारांनी एकसाथ ओरडायला सुरुवात केली. यावेळी मुनगंटीवार यांनी ,’पाटील साहेब मी तुमची ९ अर्थसंकल्पाची भाषणे ऐकली आहेत, तुम्ही खाली बसा तुमच्यासाठी मी ४-५ शेर घेऊन आलोय’ असा टोला मारला. वळसे पाटील यांनी जयंत पाटलांना खाली बसण्याची सूचना केल्यांनतर ते खाली बसले. बाकी अर्थसंकल्पातून काय मिळाले किंवा काय मिळाले नाही हे आता आपणासमोर आलेच आहे.
हे देखील वाचा
हा अर्थसंकल्प या सरकारचा किमान या टर्मचा शेवटचा अर्थसंकल्प आहे. जनतेच्या अपेक्षेवर सरकार खरे उतरले असेल तर नक्की पुढील अर्थसंकल्प मांडण्याची संधी फडणवीस सरकारला मिळेल. विरोधकही आता शांत होते म्हणजे पुढे शांतच राहतील असेही नाही. सत्तेत सहभागी सेनेची नाराजीही उघड आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याच सरकारविरोधात आपल्या भागासाठी एल्गार करणाऱ्या नाथाभाऊंच्या खान्देशला या अर्थसंकल्पात गाजर मिळाले आहे. यामुळे विरोधकांसह आता नाथाभाऊंच्या वाढत्या रोषाचा सामना अधिवेशनात पुढील काळात सरकारला करावा लागणार हे मात्र नक्की.
-निलेश झालटे