शांताई माध्य. विद्यालयाचे विद्यार्थी भागवताहेत पक्षांची तहान

0

शिक्षक विशाल बेनुस्कर यांचा तीन वर्षांपासून ’एक कटोरी पंछीयो के लिये‘ उपक्रम ; बाटल्यांव्दारे पाणी, तसेच पक्षांसाठी अन्न केले उपलब्ध

पिंपळनेर – पावसाचे प्रमाण या वर्षी कमी झालेले आहेत. त्यातच मे महिण्यापूर्वीच उन्हाचा तडाखा सर्वत्र जाणवत आहे. अंगाची लाही-लाही करणार्‍या तडाक्यात मानवाचीही पाण्यासाठी भटकंती होत असून पशू पक्षांचेही हाल होत आहे. पक्षांचे हाल होवू नये म्हणून सामाजिक बांधिलकी म्हणून पिंपळनेर येथील शांताई माध्यमिक विद्यालयाच्या पक्षीप्रेमी विद्यार्थ्यांकडून पक्ष्यांची तहान भागविली जात आहे. विद्यालयाच्या प्रांगणात प्लास्टिकच्या बाटल्यांच्या माध्यमातून झाडावर पक्षांसाठी पाणी तसेच अन्न उपलब्ध करुन दिले आहे.

पिंपळनेर सह परिसरासह सर्वत्र उन्हाचा तडाखा असताना पक्षीप्रेमींनी मात्र अशा कडक उन्हात बाहेर पडून पक्षांसाठी दाणा- पाणी देवून तहान भागविण्याचा उपक्रम यावर्षीही राबविला आहे.

सलग तीन वर्षांपासून उपक्रम
येथील शांताई माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षक श्री विशाल बेनुस्कर यांनी गेल्या तीन वर्षांपासून आपल्या शाळेत एक कटोरी पंछीयो के लिये हा उपक्रम सुरू केला असून त्यास शाळेतील विद्यार्थ्यांनी साथ देत एक आदर्श डोळ्यासमोर ठेऊन शाळेच्या प्रांगणात सर्वत्र अशी सोय उपलब्ध केली आहे. त्याचप्रमाणे स्वतःच्या घराच्या गॅलरीत व छतावर पक्ष्यांना उन्हापासून दिलासा मिळवा व त्यांची तृष्णा भागवली जावी म्हणून रिकामी बाटली,लहान प्लास्टिकच्या कॅन मध्ये पाणी ठेवले व अन्न ठेवण्यासाठी प्लास्टिक ची वाटी ठेवली आहे.त्यात त्यांनी पक्षांसाठी पाणी, बाजरी, तांदुळाच्या दाण्यांची व्यवस्था केली आहे.

नागरिकांकडून प्रतिसादाचे आवाहन
दिवसभर शाळेच्या प्रांगणात जेव्हा-जेव्हा पक्षी पाणी व अन्न घेण्याससाठी जमा होतात तेव्हा सर्वच विद्यार्थी आनंदित होतात व प्रत्येक नागरीकाने असे प्रयत्न केले पाहिजे असे अभिमानाने सांगतात. त्याचप्रमाणे आपल्या परिसरातील नागरिकांनाही या उपक्रमाची माहिती देऊन त्याचा अवलंब करण्यास विनंती करत आहेत. एकूणच या चिव-चिवणार्‍या पक्ष्यांना कडक उन्हाळ्यात जीवदान देऊन तृष्णा भागवली जावी यासाठी नागरिकांनी किमान एक तरी वाटी व पाण्याची बाटली गॅलरीत किंवा छतावर ठेवावी अशी आर्त हाक विद्यार्थ्यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांच्या या अभियानात शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक एस.जे.बागुल व एस.एस.पाटील यांनीही मोलाची साथ दिली आहे.

…तर पक्षांना जीवदान मिळेल
अनेकदा पाण्याअभावी पक्ष्यांना मृत्यूला सामोरे जावे लागते. शहरात नदी-नाले, गटारी यांतून पाणी वाहते परंतु हे पिण्यायोग्य नसते. असे असले तरी या पक्ष्यांना हे पाणी पिण्याशिवाय पर्याय नसतो.त्यामुळे अशा पक्ष्यांना आपण पाणी ठेवणे गरजेचे आहे. कारण तहानलेले पक्षी पाण्यासाठी सैरा-वैरा फिरतात. चिव-चिवणार्‍या या चोचिंना अगदी काही थेंब पाणीच लागत असते याचा प्रत्येकाने विचार करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने या जीवांना वाचविण्यासाठी आपल्या घराबाहेर किंवा छतावर पाणी ठेवल्यास नक्कीच या पक्ष्यांना जीवदान मिळेल.