इंदापूर । नारायणदास रामदास चॅरिटेबल ट्रस्ट, रोटरी क्लब व इंदापूरमधील माजी विद्यार्थी संघटना यांच्या सहकार्यातून जिल्हा परिषद शाळा क्रमांक 4 व 6 ही सर्वांत जुनी ‘तारेची शाळा’ आता कात टाकत आहे. कसब्यातील या शाळेत ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके, ग. प्र. प्रधान यांचे शिक्षण झाले. या शाळेला तारेचे कुंपण होते म्हणून याला ‘तारेची शाळा’ असे म्हणतात. आता या शाळेला भिंतीचे कुंपण घालण्यात आले आहे. अनेक विद्यार्थी या शाळेतून घडले. गोंवडे, गानबोटे, भालेराव, गायकवाड, डाके, कुंभार, भिसे या गुरुवर्यांच्या शिस्तप्रिय मार्गदर्शनाखाली अनेकांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.
भिंती लागल्या बोलू…
नारायणदास ट्रस्टच्या माध्यमातून या शाळेत अनेक बदल होताना दिसत आहेत. मुकुंदशेठ शहा, भरतशेठ शहा, वैशाली शहा यांनी या शाळेची घरपट्टी भरली. शाळेतील तुटलेल्या खिडक्या, दरवाजे दुरुस्त केले. पावसाळ्यात पत्रे गळत होते. तेही दुरुस्त करण्यात आले. नगरपरिषदेच्या माध्यमातून चेंबर बसविण्यात आला. ‘बोलक्या भिंती’ तयार केल्यामुळे मुलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पालकांनी देखील याबाबत समाधान व्यक्त केले. नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी शाळेची पाहणी करून समाधान व्यक्त केले. मुकुंदशेठ शहा, नगरपरिषदेचे गटनेते कैलास कदम, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अशोक कासवटे, शिक्षण विस्तार अधिकारी राजकुमार बामणे, जावेद शेख, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष पद्मसिंह जाधव, अॅड. रूहुल शेख, व्यवस्थापन समिती सदस्य समीर सय्यद, उजेर शेख आदी उपस्थित होते.
शाळेच्या समस्यांवर चर्चा
जिल्हा परिषद शाळा क्रमांक 4च्या मुख्याध्यापिका रोहिणी दळवी तसेच शाळा क्रमांक 6चे मुख्याध्यापक दत्तात्रय ठोंबरे, सहशिक्षिका फातिमा शेख, वैशाली थोरात, सुलताना मोमीन, सहशिक्षक दिनेश काळे यांच्याशी शाळेच्या समस्यांबाबत नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी चर्चा केली. तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषदेकडे शाळेच्या समस्यांबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेतील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे तसेच लवकरच शाळेला सिमेंट कलर देऊ, असे आश्वासन इंदापूर नगरपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते कैलास कदम यांनी दिले.