पुणे । शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील बहुमूल्य योगदानाबद्दल शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शांतिलाल मुथ्था यांना यंदाचा राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. बालदिनाचे औचित्य साधून केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्रालयातर्फे नवी दिल्लीत आयोजित सोहळ्यात त्यांना सन्मानित करण्यात आले.
1993च्या लातूर भूकंपात 1200 भूकंपग्रस्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पुनर्वसन करण्यासाठी वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प उभा केला. मेळघाट व ठाणे परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांना या ठिकाणी आणले होतेे. जमू-काश्मीर भूकंपातील 500 विद्यार्थांना शिक्षणासाठी तसेच गेल्या तीन वर्षांपासून आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या 600 मुला-मुलींचे शैक्षणिक पुनर्वसन सुरु आहे. या विद्यार्थ्यांसाठी या प्रकल्पामध्ये ‘मेंटल हेल्थ’ विभागाची स्थापना करण्यात आली आहे. गुजरात भूकंपामध्ये 368 शाळा बांधून यामध्ये 1 लाख 20 हजार विद्यार्थांची तीन महिन्यात शाळेत बसण्याची व्यवस्था करण्यात आली. बीड जिल्हा परिषदेच्या 500 शाळांतील 35 हजार विद्यार्थ्यांबरोबर मूल्यशिक्षणाची सुरुवात फाउंडेशनने केली आहे. ‘स्मार्ट गर्ल्स’ या उपक्रमांतर्गत 73 हजार 625 मुलींचे सक्षमीकरण करण्यात आले.