मुंबई । पवित्र दीक्षाभूमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्यात वापरलेले ऐतिहासिक वस्तू असलेले शांतीवन (चिंचोली गाव) व ड्रॅगन पॅलेस (कामठी), हया क्षेत्राचा बुध्दीस्ट सर्कीट म्हणून विकसित करण्यासाठी राज्य सरकारने स्वदेश दर्शन योजने अंतर्गत निधी मिळण्यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयास सप्टेबर 2016ला रूपये 99.99 कोटीचा प्रस्ताव दिला, हा निधी कमी असून राज्य सरकारने रूपये 1000 कोटीचा नवीन प्रस्ताव सादर करावा,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते, आमदार प्रकाश गजभिये केली.
आमदार प्रकाश गजभिये यांनी विधानपरिषद सभागृहात तारांकित प्रश्नाव्दारे विचारलेल्या प्रश्नाला सरकारने समाधानकारक उत्तर न देता केवळ आंबेडकरी जनतेच्या भावनांशी भाजप सरकार खेळत असल्याचा घणाघाती आरोप गजभिये यांनी केला.
पत्रकारांशी बोलतांना गजभिये म्हणाले, जगात प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे, अस्पृश्य, बहुजनांचे उध्दारक, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनात त्यांना प्रत्येक क्षणात साथ व ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार त्यांच्या वापरातील अनेक वस्तू शांतीवन चिचोली येथील वस्तूसंग्रालयात आहेत,हे वस्तूसंग्राहलय जगाच्या नकाशात दिसून संपूर्ण जगात ओळखले जावे. या चिंचोली गावाच्या विकासासाठी सरकारने 500 कोटीचा निधी त्वरीत द्यावा व शांतीवन चिचोली ते दीक्षाभूमी मार्गावर मेट्रो रेल्वे सुरू करण्यात यावी, अशी मागणी आज तारांकित प्रश्नाव्दारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते, आमदार प्रकाश गजभिये यांनी राज्य सरकारला केली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवनात वापरलेलेल्या अनेक ऐतिहासिक वस्तू चिचोली गावाच्या संग्राहलयात आहेत. या गावाचा चेहरा मोहरा बदलविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते,आमदार प्रकाश गजभिये यांनी ‘आमदार आदर्श गाव’ म्हणून निवड करून जगात चिचोलीचे नाव व्हावे, यासाठी ते प्रयत्नशिल आहेत तर संपूर्ण चिचोली गाव – शांतीवन विकासाकरीता दत्तक घेतले.
बाबासाहेबांनी वापरलेल्या ऐतिहासिक वस्तूंचे दर्शन घेण्याकरिता दरवर्षी लाखो अनुयायी येतात, या ऐतिहासिक वस्तूंचा स्पर्श जणू एक नवऊर्जा निर्माण करित असते.