शांतीनगरात टवाळखोर झाले शिरजोर

0

भुसावळ। शहरातील शाळा महाविद्यालय परिसरात टवाळखोर मुले तरुणींची छेडखानी करण्याचा प्रकार वाढला आहे. काहींनी तर हद्दच पार केली असून शांतीनगर परिसरातील रहिवासी भागात सायंकाळच्या सुमारास काही प्रेमीयुगल ठिकठिकाणी अश्‍लिल चाळे करताना दिसून येतात. यावर त्यांच्याकडे परिसरातील कुणी पाहिले जरी तर रहिवाशांना अश्‍लिल शिवीगाळ करतात. याप्रकारामुळे संतप्त झालेल्या महिलांनी गुरुवार 13 रोजी दुपारच्या सुमारास थेट शहर पोलीस स्थानकात धडक देऊन आपला संताप सहाय्यक पोलीस अधिक्षक निलोत्पल यांच्याकडे व्यक्त केला.

प्रेमीयुगलाचे अश्‍लिल चाळे
रेल्वे ड्रेनेज परिसर, गोविंद कॉलनी आणि सोमेश्‍वर कॉलनी परिसरात सकाळी 6 वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत गेल्या चार ते पाच महिन्यांपासून टवाळखोर मुले दारु, सिगरेट पित बसतात तर काही प्रेमीयुगल अश्‍लील चाळे करीत असल्याची तक्रार या महिलांनी केली आहे.

महाविद्यालय परिसरात वाढला उच्छाद
तसेच महाविद्यालय सुटल्यास परिसरात रस्त्यावरच दुचाकी वाहने उभी करुन तरुणींची छेड काढली जाते. यावर कुणी काही बोलल्यास शिवीगाळ तसेच मारहाणही केल्याचे प्रकार होत असल्याचे रहिवासी महिलांनी सांगितले. तसेच रेल्वे चाळ परिसरातील काही तरुण नियमित या भागात येऊन भरधाव वेगाने बुलेट पळविणे, दारु पिणे असे प्रकार करुन दहशत निर्माण करीत असल्याचेही रहिवाशांनी सांगितले. तसेच रेल्वे ड्रेनेज परिसरात रेल्वे कॉलनीकडून जोडणार्‍या रस्त्याला बंद करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली.

यासंदर्भात सहाय्यक पोलीस अधिक्षक निलोत्पल यांनी रहिवाशांचे म्हणणे ऐकून घेत गस्तीसाठी कर्मचारी नियुक्त करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच असे कुणी टवाळखोर दिसल्यास लागलीच पोलीसांना दूरध्वनीवरुन सुचित करा किंवा त्यांचे वाहन क्रमांक नोंद करुन ठेवण्याचे सांगितले. याप्रसंगी सुनिता भोळे, रुपाली यादव, सुनंदा ताडे, सिमा पाटील, लक्ष्मी पाटील, संगीता कोळी, अनिता पाटील, शोभा धर्माधिकारी, आरती टोंगळे, माला यादव, शालिनी वाघुळदे, ज्योती डहाळे, सुशिला मेढे, यशवंत वाघोदे, अशोक वाणी, रमेश पाटील, संगिता धांडे, दत्तात्रय महाजन, कुंदा महाजन,
उषा सोनवणे आदी उपस्थित होते.