पुणे । धर्म ही जशी प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक बांधिलकी आहे, अगदी त्याचप्रमाणे ती समाजिक बांधिलकीही आहे. आज जगात शांतीची नितांत गरज आहे. मात्र ही शांती केवळ वैयक्तिक पातळीवरची नसून ती सामूहिक स्वरूपातदेखील प्रत्येक व्यक्तीचे उद्दिष्ट बनली पाहिजे, असे प्रतिपादन अमेरिकेतील ‘चर्च ऑफ जीझस ख्राइस्ट लॅटर डे सेंट्स’चे प्रमुख मार्गदर्शक एल्डर डी टॉड ख्रिस्तोफरसन यांनी केले.
विश्वशांती केंद्र आणि डॉ.विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे नोबेल शांतता पारितोषिकाच्या धर्तीवर दिला जाणारा ‘तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर जागतिक शांतता पुरस्कार-2017’ अमेरिकेतील मॉर्मन कम्युनिटीचे मेंबर ऑफ द कोरम ऑफ ट्वेल्व्ह अॅपॉस्टल्स, व अमेरिकेतील सॉल्ट लेक सिटी येथील द चर्च ऑफ जीझस ख्राइस्ट ऑफ लॅटर डे सेंट्स, एल्डर डी टॉड ख्रिस्तोफरसन यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.
शांतता व संस्कृतीच्या रक्षणासाठी
डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, ख्रिस्तोफरसन यांनी आपले संपूर्ण जीवन समाजाच्या सेवेला समर्पित केले आहे. आज आम्ही सगळे जण जगात शांतता नांदावी आणि संस्कृतीचे रक्षण व्हावे या कारणासाठी एकत्र आलो आहोत. ही एक लहान सुरुवात आहे. आमच्या संस्थेने स्वामी विवेकानंदाच्या वचनांचे अनुसरण केले आहे.
बाबासाहेब पुरंदरे म्हणाले, आज ज्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जात आहे, त्या व्यक्तीमध्येच मोठेपणा व नम्रपणा आहे. ज्या संताच्या नावाने हा पुरस्कार दिला गेला आहे. त्यांनी निर्मिलेले ‘पसायदान’ ही अशी एकमेव प्रार्थना आहे की ती जर इतर कोणत्याही धर्म चिन्हाच्या खाली लावली गेली तर ती त्याच धर्माची प्रतिनिधी असेल. हेच या पसायदानाचे खरे सौंदर्य आहे.
डॉ. मायकेल नोबेल म्हणाले, शांततेमध्ये नोबेल पारितोषिक हे सहसा शांततेच्या प्रसारासाठी जगभर एक गमक मानले जाते. पण त्याशिवाय इतरही प्रतिष्ठित पुरस्कार आहेत. त्यांपैकीच एक म्हणजे हा ‘विश्व शांती पुरस्कार’ आहे. शांततेसाठी दिला जाणारा हा पुरस्कार भारतातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माउलींची सुवर्णजडित मूर्ती, प्रतिमा असलेले सुवर्णपदक, सन्मानपत्र, शाल व रोख सव्वापाच लक्ष रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते. प्रा. राहुल कराड यांनी पुरस्काराची माहिती दिली. सूत्रसंचालन प्रा. गौतम बापट यांनी केले. आभार प्रा. स्वाती कराड-चाटे यांनी मानले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी अमेरिकेतील नोबेल चॅरिटेबल ट्रस्टचे माजी अध्यक्ष डॉ. मायकेल नोबेल, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, डॉ. विश्वनाथ दा. कराड, डॉ. विजय भटकर, प्रा. राहुल विश्वनाथ कराड, फादर फंक, एल्डर विल्यम्स, मॅथ्यू हॉलंड, प्रा. डॉ. मंगेश कराड, डॉ. चंद्रकांत पांडव, प्रा. स्वाती चाटे, नानिक रुपानी आदी उपस्थित होते.