शांत, संयमी नेतृत्वासोबत विकासाचे व्हिजन असल्याने आमदार संजय सावकारेंना कौल

0

विश्‍लेषण : माजी आमदार संतोष चौधरींची खेळी फेल : विरोधकही ठरले दुबळे

भुसावळ (गणेश वाघ)- भुसावळच्या निवडणूक आखाड्यात भाजपाला गड राखण्याचे आव्हान असतानाच विद्यमान आमदार संजय सावकारे यांनी विरोधकांना धोबीपछाड देत विरोधकांवर टिका करण्याऐवजी केवळ जनतेपुढे विकासाचे व्हिजन मांडल्याने जनतेला ते भावले व त्यांनी पुन्हा सावकारेंनाच कौल दिल्याने त्यांना हॅट्रीक साधता आली. भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरींनी सावकारेंना पाडण्यासाठी चाललेल्या सर्वच खेळी येथे अपयशी ठरल्या शिवाय सावकारेंसोबत माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्या आशीर्वादाने लेवा समाज एकसंघपणे उभा ठाकला शिवाय शहरातील स्थानिक समस्या वगळता ग्रामीण भागात सिंचनासह रस्त्यांच्या झालेल्या कामांमुळे मतदार समाधानी असल्याने सावकारेंचा विजय सुकर झाला.

तुल्यबळ विरोधकांचा अभाव
महाआघाडीत तिकीटाच्या साठमारीत माजी नगरसेवक जगन सोनवणे यांनी तिकीट मिळवण्यात यश मिळवल्याने संजय ब्राह्मणेंसह सतीश घुलेंचा पत्ता कट झाला शिवाय तत्पूर्वीच माजी आमदार संतोष चौधरींसाठी सतीश घुले हेच महाआघाडीचे उमेदवार असतील म्हणून केलेली घोषणा अडचणीची ठरली. पक्षाने सोनवणे यांना उमेदवारी दिल्यानंतरही चौधरींनी मात्र पक्षाच्या अडचणीमुळे आपल्या उमेदवाराला उमेदवारी न मिळाल्याची कबुली देत घुलेंचा उत्साह वाढवला तर दुसरीकडे अखेरच्या क्षणी अपक्ष उमेदवार डॉ.मधू मानवतकर यांना पाठिंबा देत याच आता आपल्या पाठिंब्याचे उमेदवार असल्याचे जाहीर केल्याने निवडणुकीत रंगत आणखीन वाढली. प्रचारात आघाडी घेतलेल्या घुलेंसाठी ही बाब अडचणीची ठरल्याने त्यांनीदेखील माघार न घेता किल्ला लढवणार असल्याची भूमिका घेतली तर तिकीट न मिळाल्याने संजय ब्राह्मणेंनी माघार घेतल्याने तिरंगी लढत स्पष्ट झाली. माजी आमदार चौधरी नेमके कोणत्या उमेदवाराच्या पाठिमागे? हा भुसावळातील नागरीकांना संभ्रमही वाढला तर रावेरच्या निवडणुकीत त्यांचे बंधू अनिल चौधरी उभे असल्याने त्यांच्यासाठी होत असलेल्या धावपळीमुळे भुसावळात ही बाब भाजपासाठी फायदेशीर ठरली तर दुसरीकडे राष्ट्रवादीचा कुठलाही पदाधिकारी जगन सोनवणेंसोबत सहभागी झाला नसलातरी त्यांनी मात्र एकाकीपणे झुंज लढवत माजी आमदार चौधरींवर प्रत्येक सभेत टिकास्त्र सोडून सभांना गर्दीही जमवली.

विरोधकांच्या मुद्यांऐवजी विकासाचे व्हिजन भावले
भुसावळातील रस्त्यांची दुरवस्था, अमृत योजनेला होणारा विलंब आदी मुद्दे विरोधकांनी प्रचारात लावून धरले मात्र आमदारांनी शांत व संयमीपणे अमृत योजनेच्या विलंबाची कारणे सांगितली शिवाय रस्त्यांची कामे का रखडली ? ही बाब मतदारांना पटवून दिली शिवाय विकासाचे व्हिजन मांडल्याने मतदारांनाही ही बाबही भावली. शहरात समस्या असल्यातरी ग्रामीण भागात झालेली रस्त्यांची कामे, तळवेल उपसा सिंचना योजना, वरणगावातील प्रशिक्षण केंद्र शिवाय सिंचनाच्या कामांमुळे मतदारांनी आमदारांना तारल्याचे दिसून आले.

लेवापाटीदार समाज एकसंघपणे सावकारेंच्या पाठिशी
भुसावळच्या निवडणुकीत लेवा पाटीदार समाजाची भूमिका निर्णायक राहिली. भोरगाव लेवा पंचायतीच्या कुटुंब नायकांनी आमदारांना पाठिंबा दशर्वल्यानंतर काहींनी त्याबाबत नाराजी व्यक्त करीत लेवा समाजाच्या सुनांना मतदान करण्याचे आवाहन केले, तसा प्रचारही केला मात्र लेवा समाज एकसंघटपणे आमदारांच्या पाठिमागे राहिला शिवाय माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सावकारेंना दिलेला शब्दही खरा केल्याने आमदारांचा सहज विजय झाला.

हॅट्रीक साधली, लीडबाबतीत रेकॉर्डही तोडले
भुसावळात आतापर्यंत दिलीप आत्माराम भोळे वगळता दोन वेळा आमदार होण्याची संधी कुणालाही मिळालेली नाही. 1995 व 1999 मध्ये भोळेंनी मिळवलेल्या विजयानंतर आमदार सावकारे हे 2009 व 2014 च्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर 2019 मध्ये पुन्हा हॅट्रीक साधल्याने ते भाजपासाठी नशीबवान उमेदवार म्हणून सिद्ध झाले. गतवेळच्या निवडणुकीत त्यांनी 34637 मतांची लीड मिळवून त्यांनी प्रतिस्पर्धी अ‍ॅड.राजेश झाल्टे यांचा दारुण पराभव केला तर यंदाच्या निवडणुकीत 81 हजार 689 मते घेत तब्बल 53 हजार 14 मतांचा लीड घेत आतापर्यंतचे स्वतःसह सर्व उमेदवारांचे रेकॉर्ड तोडले.

उत्कृष्ट संघटन, सावकारे सर्वच बाबीत आघाडीवर
भाजपाचे उत्कृष्ट संघटन, शक्तीप्रमुख केंद्रप्रमुख, कार्यकर्त्यांचे संघटन आमदारांसाठी रात्रं-दिवस झटत होते. दुसरीकडे सोशल मिडीया, डिजिटल मिडीयाद्वारे सावकारेंचे व्हिजन मतदारांपर्यंत पोहोचवण्यात यशदेखील आले. भाजपाचे भुसावळसह वरणगाव पालिकेवर असलेली सत्ता, पंचायत समितीच्या सहा जागांपैकी चार जागांवर भाजप उमेदवाराची वर्णी तर जिल्हा परीषदेच्या तीनपैकी एका जागा भाजपाकडे असल्याने तसेच मतदारसंघातील 39 पैकी 70 टक्के ग्रामपंचायतींवर भाजपची सत्ता असल्याची बाब आमदारांच्या विजयासाठी सुकर ठरली.