शाकाहारी विद्यार्थ्यालाच सुवर्ण पदक!

0

पुणे : तुम्ही शाकाहारी असाल तरच तुम्हाला पुणे विद्यापीठात सुवर्णपदक मिळू शकते. कारण तसा अजब फतवाच पुणे विद्यापीठाने काढला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर कीर्तनकार शेलारमामा यांच्या नावाने सुवर्णपदक देण्यासाठी पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

योगमहर्षी शेलारमामा सुवर्णपदक
पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये दरवर्षी योगमहर्षी राष्ट्रीय किर्तनकार रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलारमामा सुवर्णपदक देण्यात येते. विज्ञान विद्याशाखा आणि विज्ञानेतर विद्याशाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी या पदकासाठी अर्ज करु शकतात. दरवर्षी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर यासंबंधी पत्रक प्रसिद्ध करण्यात येते. मात्र यंदा प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकांमध्ये अटींची मोठी यादीच देण्यात आली आहे. विज्ञानेतर शाखेचा विद्यार्थीच या पदकासाठी पात्र असल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले असून 15 नोव्हेंबरपर्यंत महाविद्यालयांनी या सुर्वणपदकासाठीचे प्रस्ताव विद्यापीठाकडे पाठवणे बंधनकारक आहे.

ध्यानधारणा, प्राणायाम, योगासनांचीही अट
पत्रकात अटींची मोठी जंत्रीच देण्यात आली आहे. विज्ञानेतर शाखेचा विद्यार्थी या पदकासाठी पात्र असेल. विद्यार्थी दहावी, बारावी आणि पदवी परीक्षेतील प्रथम किंवा द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण असावा त्यातही ध्यानधारणा, प्राणायाम, योगासने करणार्‍या विद्यार्थ्यास प्राधान्य आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हा विद्यार्थी शाकाहारी आणि निर्व्यसनी असावा, अशी अजब अट यामध्ये आहे.