शाडूच्या गणेशमूर्तींच्या मागणीत यंदा दुपटीने वाढ..!

0

पेण (राजेश प्रधान)। पर्यावरणविषयक जनजागृतीचा सकारात्मक परिणाम सण उत्सवावर होवू लागला आहे. आता इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याकडे कल दिवसेदिवस वाढत चालला आहे. शाडूच्या मूर्तीच्या मागणीत गेल्या वर्षाच्या तुलनेत दुपटीने वाढ झाली असल्याचे मूर्तिकारांचे म्हणणे आहे. पुढच्या वर्षीत हा आलेख आनखी वाढेल असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. मानवी हस्तपेक्षामुळे पर्यावरणाचा र्‍हास होत चालला आहे. सण उत्सवाच्या माध्यमातून निसर्गाची हानी मोठया प्रमाणात होऊ लागली आहे. त्यातली त्यात गणेशोत्सवाचा विचार केल्यास प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचा वापर सर्वाधिक गेल्या काही वर्षांपासून होत आहे.

गणपतींसाठी नैसर्गिक आरास
बाप्पांच्या मूर्तींकरिता नैसर्गिक रंग वापरण्याचे प्रमाण आता वाढत चालले आहे. बाप्पाची आरास ही ईको फ्रेंडली करण्याची मानसिकता वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बाजारात या वर्षी कागदाचे फोल्डिंग मखरही विक्रीस आले आहेत. घरगुती गणपतींसाठी नैसर्गिक आरास करण्यावरच भर दिला जात आहे.

ईको फ्रेन्डली गणेश उत्सवांकडे वाढला कल
गेल्या काही वर्षांत शाडूच्या मूर्तीची मागणी कमलीची घटली होती. प्लास्टर पॅरिसचे गणपती स्वस्त आणि आकर्षित करणारे असल्याने भाविकांकडून अशा प्रकारच्या मुर्तींना अधिक पसंती दिली जावू लागली. मात्र हे करत असताना पर्यावरणाच्या संतुलनाकडे दुर्लक्ष झाले. पाण्याचे प्रदूषण होऊ नये याकरिता काही पर्यावरणप्रेमी संस्थाकडून विसर्जनाकरिता कृत्रिम तलावाची निर्मिती गेल्या काही वर्षात करण्यात येऊ लागली. ईको फ्रेंडली गणेशोत्सव ही संकल्पना आता अधिकाधिक गणेशभक्त, मंडळापर्यंत पोहचू लागली आहे. पर्यावरणाविषय जागृती झाल्याने पेण, पनवेल परिसरात आता इको फ्रेंडली गणेशोत्सवाला पसंती मिळू लागली आहे. सार्वजनिक गणपती मंडळांपेक्षा घरगुती गणेशोत्सवाकरिता शाडूंच्या मूर्तींमध्ये यंदा वाढ झाली आहे.