मागील 8 वर्षांपासून इसिए संस्थेच्यावतीने राबविले जातोय हा उपक्रम
इसिएकडून आवश्यक सर्व साहित्य देणार
पिंपरीः इसिएतर्फे मागील आठ वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरात शाडू मातीपासून मूर्ती बनविण्याचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. प्लास्टर ऑफ पॅरीसमुळे नदी प्रदुषणात वाढ होते. त्यामुळे इसितर्फे पर्यावरणपूरक मूर्ती बनविण्यासाठी सर्वांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. हा उपक्रम बुधवारी महानगरपालिका ब क्षेत्रीय कार्यालयातून सुरुवात झाली. सुरवातीच्या कार्यक्रमात ब क्षेत्रीय कार्यालय परिसरातील 29 शाळांचे मुख्याध्यापक या उपक्रमात आपल्या विद्यार्थ्यांसह सहभागी झाले. त्यात महानगरपालिका मालकीच्या शाळा व खाजगी शाळांचा सहभाग होता. पर्यावरण तज्ञ विकास पाटील यांनी शाडू माती मूर्ती कशी बनवायची याबाबत मुख्याध्यापकांना माहिती दिली. संपूर्ण शहरात हा उपक्रम 635 शाळांमधून कसा राबवायचा याबाबत मार्गदर्शन केले. यासाठी आवश्यक सर्व साहित्य व मार्गदर्शन इसिएकडून मोफत पुरविले जाईल असे विकास पाटील यांनी सांगितले.
प्रशिक्षण तीन टप्प्यात होणार
या उपक्रमाबद्दल माहिती देताना पाटील म्हणाले की, या उपक्रमाचे 3 टप्पे पार पडणार आहेत. सर्व शाळा मुख्याध्यापकांची क्षेत्रीय अधिकार्यांसोबत एकत्रित बैठक, प्रत्येक शाळेच्या दोन शिक्षकांना शाडू माती मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण व प्रशिक्षित शिक्षक आपापल्या शाळेत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतील. टप्पा क्रमांक तीनसाठी आवश्यक शाडू माती एक दिवस आगोदर शाळेने ताब्यात घेवून ती भिजत घालायची आहे. जेणे करून ती दुसर्या दिवशी मूर्ती बनविण्यास वापरता येईल. शाळा प्रतिनिधींनी इसिएच्या मुख्य कार्यालयातून माती घेवून जाणे बंधनकारक आहे. टप्पा क्रमांक दोनसाठी आवश्यक माती नमूद केलेल्या चार शाळा प्रतिनिधींनी एक दिवस आगोदर ताब्यात घ्यावयाची आहे. शाळा प्रतिनिधींनी स्वतः इसिए मुख्य कार्यालयातून माती घेवून जाणे बंधनकारक आहे.
शाळाप्रमुख व अधिकार्यांची बैठक
पहिल्या टप्प्यामध्ये सर्व शाळा मुख्याध्यापकांची क्षेत्रीय अधिकार्यांसोबत एकत्रित बैठक होणार आहे. अ, ब, क, ड, ई, ग, ह, फ या क्षेत्रिय कार्यालयांच्या परिसरामध्ये दि. 11 ते 19 जुलै दरम्यान या बैठका होणार आहेत. दुसर्या टप्प्यामध्ये परिसरानुसार शाळा शिक्षकांना शाडू माती गणेश मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार. सांगवी मनपा शाळा 1 ऑगस्ट रोजी, भोसरी मनपा शाळेत 2 ऑगस्ट रोजी, आकुर्डी मनपा शाळेत 3 ऑगस्ट रोजी तर चिंचवड स्टेशन मनपा शाळेत 4 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 वा. हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तिसर्या टप्प्यामध्ये 6 ते 31 ऑगस्टपर्यंत प्रशिक्षित शिक्षक स्वतःच्या शाळेत विद्यार्थ्याना शाडू माती गणेश मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देणार आहेत. शाळेत प्रशिक्षित शिक्षकांना शक्य तेव्हा आणि शाळेच्या वेळेनुसार प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ह्याचा लाभ मिळेल अश्या प्रकारे नियोजन करण्याचे सूचित केले आहे. कार्यशाळेचे फोटो व व्हिडीओ तयार इसिएला वेळोवेळी त्वरित जमा करावे. ए-चरळश्र : पसेशलर100सारळश्र.लेा
जवळच्या केंद्रात लाभ घ्यावा
6 ऑगस्ट 2018 पासून सर्व शाळांनी विद्यार्थी उपक्रम सुरु करावेत असे सुचविण्यात आले आहे. शहरातील शाळा प्रमुखांना आवाहन करण्यात आले की, ज्या शिक्षकांना शक्य असेल त्यांनी जवळच्या प्रशिक्षण केंद्रात जावून प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. मात्र तसे आगोदर कळवावे. प्रसंगी मनपा ब क्षेत्रीय कार्यालय अधिकारी खोत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. इसिए संचालक विकास पाटील, प्रभाकर मेरुकर, सुभाष चव्हाण, गोविंद चितोडकर, शिकंदर घोडके, इंद्रजीत चव्हाण आणि शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. प्रभाकर मेरुकर यांनी सूत्र संचालन केले तर सुभाष चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.