जळगाव । विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै. श्रीमती ब. गो. शानभाग विद्यालय येथे पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर आणि पंडित विष्णू नारायण भातखंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त रंग रागांचे हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मु. जे. महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य शरदचंद्र छापेकर सर यांची उपस्थिती होती. सुरुवातीला मा. श्री. शरदचंद्र छापेकर सर यांचे स्वागत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा. श्रीमती अंजली महाजन दिदि यांनी पुष्पगुच्छ व ग्रंथ भेट देऊन केले. याप्रसंगी विवेकानंद प्रतिष्ठानचे सर्व विभागातील संगीत शिक्षक, शानभाग विद्यालयाचे शिक्षक व पालक यांची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांनी सादर केली विविध गीते
शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला विद्यालयातील विद्यार्थी कु. स्नेहल वाणी हिने देश रागाची बंदिश, कु.श्रावणी भालेराव केदार रागात छोटा ख्याल, कु. अनुजा मंजुळ हिने राग पटदीप मध्ये बंदिश व तराणा,अथर्व मुंडले याने राग जौनपुरी तर निकिता पाटील, किरण पाटील, समृद्धी चव्हाण व कुणाल पाटील या विद्यार्थ्यांनी राग-अहिर भैरवची ‘अलबेला सजन आयो रे’ हि बंदिश गायली असे एकापेक्षा एक श्रवणीय राग, बंदिश व तराणा विद्यार्थ्यांनी सादर केले. यांना तबल्यावर चि.प्रसन्न भुरे, श्रेयस महाजन, रोहित बोरसे व शिवम कुलकर्णी तसेच हार्मोनियम वर गायत्री भोईटे हिने साथ दिली.
यांनी केले मार्गदर्शन
प्रमुख कलाकार भूषण खैरनार यांनी राग- भीमपलास गाउन आपली कला सादर केली. त्यांना तबल्यावर विद्यालयाचे संगीत शिक्षक श्री. भूषण गुरव आणि हार्मोनियमवर सौ.स्वाती देशमुख यांची साथ संगत लाभली.शेवटी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना मा. श्री. शरदचंद्र छापेकर सर यांनी पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर आणि पंडित विष्णू नारायण भातखंडे यांच्या जीवनकार्या विषयी अत्यंत महत्वपूर्ण माहिती सांगितली तसेच त्यांनी संगीत शिकतांना कशी काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन केले.
जीवनाचे संगीत वाजू द्या
शिक्षकांना आवाहन करतांना त्यांनी सांगितले कि, विद्यार्थ्यांना संगीताची ओळख करुन द्या व त्यांच्या जीवनाचे संगीत व्हा, असे त्यांनी सांगितले या कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अंजली महाजन व उपमुख्याध्यापक मा. श्री. जयंतराव टेंभरे याचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या शिक्षिका सौ. अनुराधा देशमुख यांनी केले. व प्रास्ताविक विवेकानंद प्रतिष्ठानचे संगीत विभाग समन्वयक श्री. किरण सोहळे यांनी केले.