शाब्बास मराठ्यांनो ! मुक्ताईनगरात घडले माणुसकीचे दर्शन

0

ट्रक चालकांना खिचडीसह भाजी-पोळीचे जेवण : कीर्तनातून वेधले लक्ष

मुक्ताईनगर (रेहान खान)- कुठल्याही आंदोलनात सर्वप्रथम टार्गेट सरकारी बसेस ठरतात व दगडफेकीत या वाहनांचे नुकसान हा आजवरच्या आंदोलनांचा अनुभव मात्र यास मुक्ताईनगर अपवाद ठरले आहे. सकल मराठा समाजातर्फे आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून येथेदेखील व्यापार्‍यांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्यात आला आहे तर मराठा समाजबांधवांनी महामार्गावर रस्ता रोको केला असलातरी ट्रक चालकांची कुठलीही गैरसोय होवू नये यासाठी त्यांना खिचडी, गंगाफळाची भाजी व पोळीची व्यवस्था केल्याने आपसुकच वाहनधारकांच्या तोंडून शाब्बास मराठ्यांनो ! हे कौतुकाचे उद्गार बाहेर पडत आहे. विशेष म्हणजे शांततेच्या मार्गाने आंदोलन केले जात असून कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृतीदेखील केली जात आहे.