शालेय वयातच वक्तृत्व गुणांचा विकास गरजेचे!

0

शिबिरामध्ये डॉ. दिलीप गरूड यांची मार्गदर्शन

सांगवी : नुसते दिसणे महत्वाचे नसते. दिसायला छान असून उपयोग नसतो, तर व्यक्तिमत्व छान होण्यासाठी प्रभावी वक्तृत्वाची गरज असते. त्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्‍वासाची गरज असते. वाचन, चिंतन व रुबाबदार देहबोलीबरोबर अभिनय, स्वरामध्ये आरोह-अवरोह असणे गरजेचे आहे. या सगळ्या गुणांच्या संगमातूनच आपले व्यक्तिमत्व घडत असते. शालेय वयातच मुलांमध्ये वक्तृत्व गुणांचा विकास होणे गरजेचे आहे, असे विचार जेष्ठ साहित्यिक डॉ. दिलीप गरूड यांनी कासारवाडी येथे मांडले. अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था आणि विद्या विकास प्रशाला यांच्यावतीने मोफत सर्जनात्मक विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थित शिबिरार्थींना मार्गदर्शन करताना डॉ. गरूड बोलत होते. यावेळी शिबिराचे अध्यक्ष राजेंद्र भोसले, मुख्याध्यापिका वंदना कोठावदे, मनिषा वेठेकर उपस्थित होते.

दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये मुकुंद तेलीचरी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना साने गुरुजीं व चंद्रकांत पाटगावकर यांची संस्कार गीते शिकवली. ओरीगामी या जपानी हस्तकलेविषयी सतीश सुरवसे यांनी मार्गदर्शन केले. मुलांना ओरीगामीच्या वस्तू करण्याचे प्रात्यक्षिकही करून दाखविले. तर मधुकर एरंडे यांनी ‘माझे आदर्श’ या विषयावर व्याख्यान दिले.

सर्वांनाच वक्तृत्वाची गरज
डॉ. गरूड म्हणाले की, आजकाल वकिल, नेते, प्राध्यापक, अभिनेते, शिक्षक आदी सर्वच क्षेत्रातील लोकांना आपल्या व्यवसायामध्ये वक्तृत्वाची गरज पडते आहे. वक्तृत्वामधूनच नेतृत्वाचा विकास होत असतो. त्यामुळेच बौध्दिकदृष्ट्या सबळ होण्याकरीता वक्तृत्व नक्कीच उपयोगी पडते. शिबिराचे सूत्रसंचालन धनश्री साळुंखे यांनी केले तर आभार कामिनी वाघ यांनी मानले.