शालेय विद्यार्थ्यांना पुरक पोषण आहार द्या

0
महापौरांची बचत गटांना सूचना
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना सकस, पुरक पोषण आहार देण्यात यावा, अशी सूचना महापौर राहुल जाधव यांनी सर्व बचतगटांना दिल्या. शहरातील शालेय विद्यार्थ्यांना वेळेत सकस पोषण आहार देणेबाबत महापौर कार्यालयात पोषण आहार पुरविणार्‍या बचतगटांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे, शिक्षणाधिकारी पराग मुंडे, विभागीय पर्यवेक्षक, शालेय पोषण आहाराचे काम पहाणारे संबंधित कर्मचारी व 38 बचत गटाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
अचानक भेट देऊन तपासणी करणार
महापौर जाधव म्हणाले की, आपण सर्व शाळांची पाहणी केलेली आहे. शहरातील विद्यार्थ्यांना सकस, पुरक पोषण आहार मिळणे आवश्यक आहे. पोषण आहार तयार करण्याच्या ठिकाणी स्वच्छता राखावी. आहार साहित्य चांगल्या दर्जाचे वापरावे. आता जसा पोषण आहार दिला जातो. तसाच यापूढेही देण्यात यावा. मी अचानक शाळांना भेट देणार आहे. त्यामध्ये पोषण आहाराची गुणवत्ता दिसून न आल्यास कारवाई करण्यात येईल. यामध्ये हलगर्जीपणा होता कामा नये. तसेच पोषण आहार पुरवठा करणार्‍या बचत गटांना त्याचे बिलही वेळेत देण्याबाबत महापौर जाधव यांनी अधिकार्‍यांना सूचना दिल्या.