शालेय विभागातील अधिकार्‍यांच्या बदल्या

0

पुणे : शालेय शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या असून अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षण संचालनालयाचे उपसंचालक तुकाराम सुपे यांची पुणे विभागीय मंडळाच्या अध्यक्षपदी पदोन्नती करण्यात आली आहे. शालेय विभागातील शिक्षणाधिकारी, सहसंचालक, सहाय्यक संचालक या पदावर असणार्‍या 24 अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच नाशिक विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र गोधने यांची शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या सहसंचालकपदी पदोन्नती करण्यात आली आहे.

पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी(प्राथमिक) मुश्ताक शेख यांची शिक्षण निरीक्षक (बृहन्मुंबई उत्तर) या पदावर बदली करण्यात आली. तर शिक्षणाधिकारी (माध्यमिक) हारूणअत्तार यांची शिक्षणाधिकारी (निरंतर शिक्षण) पदावर बदली करण्यात आली आहे. शिक्षणाधिकारी (निरंतर शिक्षण) शैलेजा दराडे यांची पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक), राज्य परिक्षा परिषदेचे सहाय्यक आयुक्त आर.जी. क्षीरसागर यांची रत्नागिरी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) पदावर बदली करण्यात आली. या व्यतिरिक्त लातूर, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, उस्मानाबाद, नागपूर, वाशिम येथील शिक्षणाधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.