शालेय समिती अध्यक्षांसह मुख्याध्यापकांनी तहसीलदारांपुढे मांडले म्हणणे

0

साने गुरूजी संस्थेतील शिक्षकेतर भरती प्रकरण ; माजी नगराध्यक्षांच्या तक्रारीची दखल

यावल- नगरपालिका संचलित साने गुरूजी माध्यमिक शाळेने शिक्षण विभागाच्या विना परवानगीने शिक्षकेतर कर्मचारी भरती करून आचारसंहितेत नियुक्ती करून आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी केल्यानंतर बुधवारी शालेय समिती अध्यक्ष दीपक बेहेडे व मुख्याध्यापक एस.आर.वाघ यांचे तहसीलदार जितेंद्र कुंवर यांनी म्हणणे ऐकून घेतले.

अपर जिल्हाधिकार्‍यांना सादर होणार अहवाल
साने गुरूजी माध्यमिक शाळेने चार शिक्षकेतर कर्मचार्‍यांची भरती शिक्षण विभागाच्या विना परवानगीने करून आचारसंहितेत त्यांची नियुक्ती केली असल्याने आचारसंहितेचा भंग झाल्याप्रकरणी शालेय समिती अध्यक्ष व मुख्याध्यापक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अपर जिल्हाधिकारी गोरख गाडीलकर यांच्याकडे अतुल पाटील यांनी केली होती. या प्रकरणी येथील तहसीलदार जितेंद्र कुवर यांना चौकशीचे आदेश देण्यात आले होते. कुंवर यांनी शालेय समितीचे म्हणणे ऐकूण घेण्यासाठी समितीचे अध्यक्ष बेहेडे व मुख्याध्यापक वाघ यांना बुधवारी तहसील कार्यालयात म्हणने सादर करण्याविषयीचे आदेश दिले होते. त्यानुसार शालेय समीतीने आपले म्हणने सादर केले आहे. त्या बाबतचा अहवाल अपर जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात येईल, असे तहसीलदार कुंवर यांनी सांगितले.

शिक्षणाधिकार्‍यांकडून चौकशीचे आदेश
जि.प.माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी येथील गटशिक्षण अधिकारी यांना या भरतीप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत तसेच तत्काळ अहवाल सादर करण्याचेही सूचित केले आहे. नगरसेवक अतुल पाटील यांनी भरती प्रक्रियेसंदर्भात तक्रार केली असून त्याबाबत तत्काळ चौकशी करून या कार्यालयास अहवाल सादर करावा, असे असे आदेश गटशिक्षण अधिकारी यांना देण्यात आले आहेत.