नवी मुंबई । दोन दिवसीय प्रशिक्षणातून शालेय सुरक्षेबाबत शिक्षकांना मोठ्या प्रमाणावर माहिती मिळाली असेल. त्याचा उपयोग शाळेतील इतर शिक्षकांना व मुलांना होईल. आपत्ती काळात काय करायचे याबाबतही सर्वांमध्ये जागरुकता निर्माण होईल. महानगरपालिका आपल्या अधिकारी, कर्मचार्यांना जे विविध प्रकारचे प्रशिक्षण देते त्यामुळे कामकाजात गतिमानता येते व शहराच्या प्रगतीला हातभार लागतो असे मत महापौर सुधाकर सोनवणे यांनी व्यक्त केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने महापालिका शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी शालेय सुरक्षा व शालेय आपत्ती व्यवस्थापन आराखडा अंतर्गत शालेय आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करणे व अद्ययावत ठेवणे याकरीता आयोजित दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप समारंभाप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
प्रशिक्षण पूर्ण करणार्या शिक्षकांना प्रमाणपत्र प्रदान
महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना कोणतीही आपत्ती सांगून येत नाही. तथापि आपत्ती व्यवस्थापनाबाबतच्या दोन दिवसीय प्रशिक्षणातून उपस्थित शिक्षकांमार्फत आपत्ती प्रसंगात काय करायचे आणि कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही याकरीता काय काळजी घ्यायची? याची माहिती व ज्ञान मुलांपर्यंत व इतर शिक्षकांपर्यंत पोहचेल आणि याचा उपयोग सर्वांना निश्चितच होईल असे सांगितले. यावेळी महापौर व महापालिका आयुक्त यांच्या हस्ते यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण करणार्या शिक्षकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.