शाळकरी मुलांना चिरडले, 9 ठार

0

बिहारमधील दुर्देवी घटना : 24 जखमी

पाटणा : बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यात शनिवारी झालेल्या भीषण अपघात 9 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 7 लहान मुलांचा समावेश असून, ते शाळा सुटल्यानंतर घरी परतत होते. भरधाव बोलेरो जीपने रस्ता ओलांडणार्‍या विद्यार्थ्यांना चिरडले. अपघातात 24 जण जखमी झाले, त्यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर आरोपी ड्राय चालक फरार झाला.

मृतांमध्ये 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुले
हा अपघात मुझफ्फरपूरला सीतामढीशी जोडणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर धर्मपूर गावाजवळ झाला. शाळा सुटल्यानंतर दोघेजण काही लहान मुलांना रस्ता ओलांडण्यासाठी मदत करत होते. तेवढ्यात भरधाव बोलेरो जीपच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि जीपने त्या मुलांना चिरडत झाडाला धडक दिली. मृतांमध्ये 9 ते 14 वर्षे वयातील मुलांचा समावेश आहे. या घटनेनंतर हॉस्पिटलमध्ये पीडितांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.

जीपचा चालक अपघातानंतर फरार
राष्ट्रीय महामार्ग 77 वर झालेल्या या भीषण अपघातानंतर धर्मपूर गावावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने लोकांची गर्दी झाली. मिनापूरचे स्थानिक आमदार मुन्ना यादवही रुग्णालयात पोहोचले व त्यांनी जखमींवर उपचार करणार्‍या डॉक्टरांशी चर्चा केली. आमदार म्हणाले की, धडक मारणारी जीप प्रचंड वेगात होती, जीपचा चालक अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झाला आहे.