जळगाव – राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने पहिली ते सातवीपर्यंतची शाळा एक डिसेंबरपासून सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र शाळेत क्लिनीक असावे, किंवा समुपदेशक असावा ही अट घातली आहे. याबाबत शाळांना अद्यापही सूचना नाहीत. यामुळे शाळांसमोर क्लिनीक सुरू करण्याची अडचण आहे. 2 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. यामुळे शाळांमध्ये शिकविताना शिक्षकांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.
शाळेत विद्यार्थ्यांना काही त्रास झाल्यास त्यावर लागलीच उपचार करता यावेत, यासाठी शाळांमध्ये क्लिनीक सुरू करण्याच्या सूचना शासनाच्या आहेत. हे क्लिनीक शिक्षण विभागाने सुरू करावयाचे असेल तर ते त्यांनी लागलीच सुरू करावे. मात्र शाळांच्या माथी क्लिनीक सुरू करण्याचा खर्च मारू नये, अशी अपेक्षा शाळा चालकांची आहे. तब्बल दीड ते दोन वर्षांपासून पहिली ते सातवीचे विद्यार्थी घरीच आहेत. घरी ऑनलाइन अभ्यास सुरू होता. आता मात्र विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागली आहे. यामुळे केव्हा एकदाचा शाळेत जातो असे प्रत्येक विद्यार्थ्याला वाटते आहे. पालक शिक्षकांच्या सर्वच शाळांमध्ये बैठका होऊन आता शाळा सुरू व्हायलाच हव्यात, अन्यथा मुलांचा शारीरिक, सामाजिक विकास खुंटेल, मुलांना मित्रांची आवड राहणार नाही असा सूर आहे. यामुळे आता काहीही झाले तरी शाळा सुरू व्हायलाच हव्यात. शिक्षकांनाही विद्यार्थ्यांना ऑनलाइन धडे देणे कंटाळवाणे होत आहे.
एक दिवसाआड शाळा
शाळांमधील गर्दी टाळण्यासाठी एका वर्गातील विद्यार्थ्यांच्या निम्मेच विद्यार्थी एका दिवशी व उर्वरित विद्यार्थ्यांना दुसर्या दिवशी शाळेत येण्यास सांगण्यात येणार आहे. खेळाच्या मैदानावर जातानाही हाच नियम लावला आहेत.
शाळांची तयारी सुरू
एक डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचे आदेश असल्याने सर्वच शाळांनी शाळेतील साफसफाई सुरू केली आहे. शाळा निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. ज्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांचे लसीकरणाचे दोन डोस झाले नसतील त्यांचे लसीकरण करून घेण्यावर भर दिला जात आहे. शाळा सुरू झाल्यानंतर कोणकोणती दक्षता घ्यावी याबाबत नियमावली तयार केली जात आहे.
असे राहतील नियम
एका वर्गातील निम्मेच विद्यार्थ्यांना एका दिवशी बोलवावे
सर्वांना मास्क, सॅनिटायझरचा वापर गरजेचा
पालकांना शाळेच्या परिसरात येण्यास बंदी
विद्यार्थी आजारी असल्यास शाळेत घेणार नाही
एक डिसेंबरपासून पहिली ते सातवीचे वर्ग सुरू होतील. तशी शाळांनी तयारी सुरू केली आहे. शाळेत समुपदेशक नेमावा, शाळेत क्लीनिक कोणी सुरू करावे, शाळांनी की शिक्षण विभागाने याबाबत अजून सूचना नाही. पालकांच्या आग्रहावरून हे वर्ग सुरू करण्यात येत आहे.
चंद्रकांत भंडारी, शालेय समन्वयक
केसीई सोसायटी.