जळगाव । जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी काही शाळांमधील पोषण आहार धान्यांची तपासणी केली असता त्यांना शाळांना पुरविण्यात येणारा धान्य निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळून आले. याबाबत त्यांनी सीईओ, शिक्षणसभापती यांच्याकडे तक्रार करुन शाळांना पुरवठा करण्यात आलेला धान्य बदलण्याची मागणी केली. दहा दिवस उलटूनही धान्य बदलण्यात आले नसल्याचे पुन्हा तपासणी केली असता निदर्शनात आले. पुन्हा तक्रार केल्यानंतर धान्य बदलविण्यात आले आहे. मात्र शाळांना नव्याने पुरविण्यात आलेले धान्य देखील खाण्यायोग्य नसल्याचे दिसून आले. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, झेडपी सदस्य जयपाल बोदडे, झेडपी सदस्या पल्लवी सावकारे यांनी वांजोळा येथील शाळेची तपासणी केली असता त्यांना नव्याने पुरविण्यात आलेला माल देखील निकृष्ट असल्याचे दिसून आले. पंचनामा करुन नमुने सीईओंना दाखविण्यासाठी आणण्यात आले होते. शिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा करुन संबंधीत प्रकार सीईओ यांच्या लक्षात आणुन देण्यात येणार आहे.
धान्य परत पाठवणार
तपासणी करुन दहा दिवस उलटल्यानंतरही निकृष्ट धान्य बदलविण्यात आलेले नव्हते. तक्रारीनंतर धान्य बदलविले मात्र नव्याने पुरविलेला धान्य देखील खाण्यायोग्य नसल्याचे दिसले. धान्य खाण्यायोग्य नसल्याचे लेखी पत्र मुख्याध्यापक यांनी दिल्याने धान्य परत घेऊन जाण्याच्या सुचना पुरवठादाराला करण्यात आले आहे. धान्य उतरविल्यानंतर समितीने प्रमाणपत्र दिल्यास पुरवठादाराला देय रक्कम दिली जाणार आहे.
एकही डाळ चांगली नाही
पोषण आहारात समाविष्ट असलेल्या धान्यांचा पुरवठा करण्यासाठी शासनातर्फे मक्ता देण्यात आलेला आहे. पुन्हा एकाच व्यक्तीकडे मक्ता देण्यात आल्याचा वाद सुरु असतांनाच निकृष्ट पोषण आहार धान्य प्रकरण उघडकीस आले. गेल्या दहा-बारा दिवसापासून याबाबत चौकशी सुरु आहे. नवीन धान्य पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आल्याने पुरवठा दाराने नवीन धान्य पुरविले आहे. मात्र नव्याने दिलेल्या धान्यापैकी एकही धान्य चांगल्या दर्जाचे नाही. वाटाणे हे ओलसर आहे तर मटकी, मुगाच्या डाळीत उंदराचे विष्टा असल्याचे दिसून आले आहे.
जिल्ह्यातील शाळांमध्ये पुरवठा करण्यात आलेले पोषण आहार हे निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार आल्याने मी स्वतः वांजोळा येथील मराठी शाळेत चौकशी केली असता नव्याने पुरविण्यात आलेला धान्य देखील निकृष्टच असल्याचे दिसून आले आहे. पंचनामा करण्यात आले असून नमुने सीईओं यांना दाखविण्यात येणार आहे. याबाबत शिक्षणअधिकारी यांच्याशी चर्चा केली आहे.
– उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन