भुसावळ । येथील पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शाळासिद्धी या विषयावर मुख्याध्यापकांची कार्यशाळा घेण्यात आली.
व्यासपीठावर प्रभारी गटशिक्षणाधिकारी विजय पवार, शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण, डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्राचार्या अनघा जोशी, स्काऊट -गाईडच्या मुख्य सीमा भगत यांची
उपस्थिती होती.
शाळेच्या गुणवत्ता वाढीवर लक्ष देण्याचे आवाहन
गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी कार्यशाळेच्या प्रारंभी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंमलबजावणीचा आढावा घेवून सर्व शाळा प्रगत होण्यासाठी आवडीने काम करण्याचे आवाहन केले. शाळासिद्धी निर्धारक डॉ.जगदीश पाटील यांनी शाळासिद्धी या शासनाच्या उपक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. शाळासिद्धी म्हणजे शाळांची तपासणी नव्हे तर शाळा सुधारण्याचा तो एक मार्ग असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर निर्धारक नितीन भालेराव, सुरेखा पाटील, सुधीर पाटील यांनी शाळासिद्धीअंतर्गत असलेल्या विविध सात क्षेत्रांमधील पंचेचाळीस मानकांची माहिती दिली. निर्धारक प्रमोद आठवले व विजय मंगलानी यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशनची माहिती देवून उपस्थित मुख्याध्यापकांच्या शंकांचे निरसन केले. कार्यशाळेचे नियंत्रक शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण यांनी शाळासिद्धीचे महत्व प्रतिपादन करून आपली शाळा ए ग्रेडमध्ये कशी येईल याकडे लक्ष केंद्रीत करण्याचे आवाहन केले. कार्यशाळेला भुसावळ शहरातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.