शाळा डिजीटलसाठी प्रयत्न करा सीईओ दिवेगावकर यांचे आवाहन

0

जळगाव । येत्या वर्षामध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळा कशा डिजीटल होतील यासाठी प्रयत्न करावे, ज़िपतर्फे ई-लर्निंगसाठी साहित्यही देण्यात येईल, शाळा डिजीटल होण्यासाठी मुख्याध्यापकांनी प्रयत्न करावे, कारण संस्कारक्षम पिढी घडविण्याची गरज असून विद्यार्थ्यांना टेक्नोसॅव्ही करण्यासाठी प्रयत्न करावे अशा सुचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी मुख्याध्यापकांना उद्देशून केले. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे कांताई सभागृहात मंगळवारी 27 रोजी मुख्याध्यापकांच्या सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते़ याप्रसंगी मुख्याध्यापकांना सीईओ दिवेगावकर यांनी मार्गदर्शन केले. शासनातर्फे राबविण्यात येणार्‍या विविध योजना या प्रत्यक्षात शाळा तसेच विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली़ यापुढे शासनातर्फे राबविण्यात येणार्‍या नवनवीन योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले तसेच तंत्रस्नेही शिक्षक निर्माण करण्यासाठी शिक्षण विभागाने पुढकार घ्यावा असेही आदेश सीईओ दिवेगावकर यांनी दिले़ या सहविचार सभेप्रसंगी माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन, उपशिक्षणाधिकारी विकास पाटील, मुख्याध्यापक पदाधिकारी तसेच सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थीत होते़