शाळा प्रवेशात नियमांचे उल्लंघण केल्यास कारवाई

0

गटशिक्षणाधिकारी विजय पवार ; सावदा येथे आढावा सभा

रावेर- विद्यार्थ्यांना शाळा प्रवेश देताना नियमानुसार कार्यवाही करावी, नियमांचे उल्लंघण झाल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा रावेरचे गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी दिला. ते म्हणाले की, 15 जून रोजी शाळांना सुरुवात होत असून या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करावे तसेच शाळेसह परीसराची सजावट करावी व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करावे, असेही ते म्हणाले. आपत्ती व्यवस्थापनाबाबत करावयाची कार्यवाही, सरल प्रणाली, आधार नोंदणी याबाबतही त्यांनी माहिती दिली.
रावेर पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत जिल्हा परीषद, नगर पालिका, खाजगी प्राथमिक शाळा मुख्याध्यापकांची व केंद्र प्रमुखांची सहविचार सभा बुधवारी सावदा येथील श्री स्वामी नारायण गुरुकुल शाळेत झाली.

शालेय वयातच होतो शिक्षणाचा पाया पक्का -प्रांताधिकारी
प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत निवडणूक साक्षरता क्लब स्थापन करण्याच्या सूचना दिल्या तसेच निवडणूक यादी अद्ययावत करण्याबाबत मार्गदर्शन केले. शालेय वयातच गणित , विज्ञान विषयाचा पाया पक्का केल्यास स्पर्धा परीक्षेत यश विद्यार्थ्यांना मिळेल, असा सल्ला त्यांनी दिला.

गुणवत्तेसोबत संस्कारालाही प्राधान्य द्या -भक्ती किशोरदास
गुरुकुलचे उपाध्यक्ष शास्त्री भक्ती किशोर दास महाराज म्हणाले की, शालेय जीवनात बिंबवलेले संस्कार आयुष्यभर उपयोगी ठरतात. त्यामुळे मुख्याध्यापकांनी गुणवत्तेसोबत संस्कारालाही प्राधान्य द्यावे. सभेचे सूत्र संचलन किरण कराड यांनी तर प्रास्ताविक विस्तार अधिकारी नवाज तडवी यांनी केले. आभार विस्तार अधिकारी रवींद्र सपकाळे यांनी मानले.

यांची होती उपस्थिती
प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, रावेर तहसीलदार विजयकुमार ढगे, गटशिक्षणाधिकारी विजय पवार, गुरुकुलचे उपाध्यक्ष शास्त्री भक्ती किशोर दासजी, शालेय पोषण आहार अधीक्षक अजित तडवी, प्राचार्य संजय वाघुळदे, विस्तार अधिकारी नवाज तडवी , रवींद्र सपकाळे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.सुमारे 190 मुख्याध्यापक उपस्थित होते .