शाळा प्रवेशासाठी पालक चिंताग्रस्त!

0

पुणे । आपल्या मुलांना नर्सरी, एलकेजी तसेच प्राथमिकच्या इयत्तांसाठी प्रवेश मिळविण्यासाठी पालकांची धावपळ सुरू आहे. प्रवेश मिळत नसल्याने अनेक पालकांना चिंतेने ग्रासले आहे. चांगल्या इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळांमधील प्रवेशाची मर्यादित संख्या व प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांची मोठी संख्या यामुळे हा प्रश्‍न जास्त गंभीर झाला आहे. औंधमधील स्पायसर शाळेचा प्रवेश अर्ज मिळविण्यासाठी आदल्या दिवशी सायंकाळपासून पालकांनी रांग लावल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहरातील नामांकित शाळाांतील प्रवेश अर्ज मिळविण्यासाठी हेच चित्र सर्वत्र दिसून येत आहे.

अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश नाही
जूनमध्ये शाळा सुरू होणार असल्या तरी अनेक शाळांच्या पूर्व प्राथमिकची प्रवेश प्रक्रिया डिसेंबर 2017 ते जानेवारी 2018 या महिन्यांतच पूर्ण झाली आहे. तरीही अद्याप शाळेत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या खूपच मोठी आहे. एकीकडे विद्यार्थी मिळत नसल्याने महापालिकेच्या शाळा बंद केल्या जात असताना दुसरीकडे प्रवेशाअभावी विद्यार्थी व पालक चिंतातूर झाल्याचे परस्परविरोधी चित्र दिसून येत आहे.

40 ते 50 हजार रुपये डोनेशन
खाजगी शाळा मनमानी कारभार करत हजारो रूपये डोनेशन उकळत आहेत. पूर्व-प्राथमिकसाठी प्रवेश मिळविणे कठीण बनत चालल्याच्या परिस्थितीचा काही शाळांनी गैरफायदा उठवत शाळेत प्रवेश हवा असल्यास 40 ते 50 हजार रुपये डोनेशन देण्याची मागणी पालकांकडे केली आहे. काही शाळांनी नर्सरीसाठी प्रवेशाचे अर्ज पालकांकडून भरून घेतले आहेत. प्रवेशाची यादी येत्या काही दिवसात लावली जाणार आहे. त्यापूर्वी काही शाळा पालकांना बोलावून घेऊन शाळेसाठी डोनेशन देण्याची मागणी करीत आहेत. डोनेशन दिले तरच तुमच्या पाल्याचे नाव यादीत लावू, असे सांगितले जात आहे. एवढे करूनही प्रवेशाची पूर्ण शाश्‍वती नसल्याने पालकांची चिंता वाढत चालली आहे.

पालकांनी जागून काढली रात्र
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाजवळ असलेल्या स्पायसर शाळेत प्रवेश अर्ज मिळणार होेते. मात्र प्रवेश मर्यादित असल्याने प्रथम येणार्‍यास प्राधान्य या तत्वाने अर्ज दिले जाणार होते. त्यामुळे या शाळेचा प्रवेश अर्ज मिळविणेही एक दिव्य होते. तब्बल 300 हून अधिक पालकांनी हे दिव्य पार पाडले. आदल्यादिवशीच शाळेत जाऊन पालकांनी चक्क मुक्काम ठोकून दूसर्‍या दिवशी सकाळी अर्ज घेतले. शाळेच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर पालकांनीच स्वयंस्फूर्तीने ही रांग लावली होती. शाळा प्रशासनाकडून कोणतीही सूचना नव्हती, व्यवस्थाही केली नव्हती. संपूर्ण रात्र जागून काढण्याच्या तयारीनेच पालक आले होते. रात्र होऊ लागली तशी ही संख्या वाढू लागली. मध्यरात्री एक वाजता सुमारे 300 पालक शाळेबाहेरच्या फुटपाथवर रांगेत होते. रांगेची शिस्त स्वतःहून पाळली जात होती. बहुतेकांनी अंथरूण पांघरूण आणले होते. काहीजण तर मच्छर अगरबत्ती लावून बसले होते. रांगेतील अनेकांना रात्री जेवणाचा डबाही घरून आला.