जळगाव । शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये मंगळवारी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 7 नोव्हेंबर 1900 रोजीचा शाळेचा ‘पहिला दिवस’ हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.
झंवर विद्यालय, पाळधी
जळगाव। डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था(सामाजिक न्याय विभाग) यांच्यातर्फे पाळधी(ता.धरणगाव) येथील एस.एन.झंवर विद्यालयात विविध कार्यक्रम घेण्यात आले. याप्रसंगी बार्टीच्या समतादूत सोनाली साळुंखे यांनी मुलांना वाचन व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी घेतलेेले परिश्रम याविषयी मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमात सहभागी होऊन आपल्यातील कलागुणांचे सादरीकरण करावे. यावेळी संस्थेचे चेअरमन सुनिल झंवर, मुख्याध्यापक मोतीराम तसेच उपमुख्याध्यापक श्रीमती तोतला, श्री.,महाजन हे उपस्थित होते. दरम्यान सुनिल झंवर यांनी मुलांना मार्गदर्शन करतांना संविधानाचे महत्व तसेच विद्यार्थी दिवसाचे महत्व विषद केले, तर मुख्याध्यापक मोतीराय यांनी शिक्षणाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेतील शिक्षिका श्रीमती साळुंखे यांनी केले.
आरपीआयतर्फे खाऊवाटप
जळगाव। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 7 नोव्हेंबर 1900 रोजीचा शाळेचा ‘पहिला दिवस’ राज्यशासनाने ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून जाहीर केल्याचे औचित्य साधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी समतानगर येथील किलबील शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन व खाऊ वाटप करुन साजरा केला. यावेळी सरोज पाटील, मंदाकिनी जाधव, अशोक कोते, प्रताप बनसोडे, हरीश शिंदे, किरण अडकमोल, आशिक खाटीक, गणेश भालेराव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
उर्दू गर्ल्स हायस्कूलमध्ये व्यवसाय मार्गदर्शन
जळगाव। येथील के.के.उर्दु गर्ल्स हायस्कूल व ज्यु.कॉलेजमध्ये विद्यार्थी दिवसनिमित्त व्यवसाय मार्गदर्शन व व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन संगिता पाटील यांनी मुलींसाठी विशेष अभ्यासक्रम व स्वावलंबनावर आधारीत अभ्यासक्रमावर आधारित मार्गदर्शन केले. आजच्या आधुनिक युगात वाढत चाललेल्या स्पर्धांमध्ये आपले स्थान कसे काय टिकविता येईल हे सांगून कोर्सेसची सखोल माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात डॉ.अमानुल्लाह शाह यांनी मुलींना शिक्षण व स्वावलंबनाचे महत्व सांगून मुलींनी शिक्षणाकडे वळावे याविषयी मार्गदर्शन केले. शेख मजहरोद्दीन, मोहसीन शाह यांनी विद्यार्थीदिनाचा इतिहास बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षणाविषयी विचार व्यक्त केले.
प.वि.पाटील विद्यालय
जळगाव। प.वि.पाटील विद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळाप्रवेश दिनानिमित्त विद्यार्थी दिन साजरा करण्यात आला. सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील यांनी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर सर्वांनी राज्यघटनेच्या सारनाम्याचे सामूहिक वाचन केले. विद्यार्थ्यांची काव्यवाचन स्पर्धा, निबंध स्पर्धा तसेच वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. योगेश भालेराव यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व पटवून देत मार्गदर्शन केले. प्रसंगी उपशिक्षिका धनश्री फालक, सरला पाटील, चित्रलेखा गुरव, कल्पना तायडे आदी शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
इकरा शाहीन विद्यालय
जळगाव। येथील इकरा शाहीन उर्दू प्राथमिक शाळेत 7 नोव्हेंबर हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यात सर्वप्रथम मुख्याध्यापक काझी अखतरुद्दीन यांनी विद्यार्थी दिवस विषयी प्रास्ताविक केले. तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. यानंतर विद्यार्थी दिवसाच्या उपलक्षात निबंध तथा वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. सुत्रसंचालन जुल्फेकार यांनी केले. हा कार्यक्रम मुख्याध्यापक काझी अख्तरुद्दीन यांच्या मार्गदर्शनात पार पडला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.