शहादा। शहरात विविध माध्यमिक विद्यालय व महाविद्यालयाचा आवारात व आवाराबाहेर काही टवाळखोर समाज कंटक पुन्हा सक्रीय झाल्याने शहरातील शांतता धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली असुन पोलीस प्रशासनाने या गंभीर बाबीकडे डोळेझाक केली आहे. रोज सकाळी अकरा वाजेपासुन शाळा महाविद्यालये भरतांना काही समाजकंटक तरुण ज्यांचा महाविद्यालयाशी काहीही संबंध नसतो व जे सातत्याने वादग्रस्त म्हणून सर्वश्रृत आहेत ते शाळा, महाविद्यालयाच्या गेटच्या बाहेर समुहाने उभे रहातात. रस्त्यावर मोटरसायकली लावतात त्या मोटरसायकलीवर बसुन वेगवेगळे आवाज काढून मुलींची छेड काढण्याचा प्रयत्न करतात. तर काही शाळेच्या आवारात गर्दीत घुसतात. वर्गामध्ये प्रवेश करतात. शिक्षकांनी त्यांना विचारणा केल्यास शिक्षकांना अरेरावी करतात व धमक्या देण्याचे प्रकार अवलंबतात. त्यामुळे बर्याच वेळा मोठे वाद झाले आहेत. खोटे गुन्हे दाखल करण्याचा धमक्या ह्या समाज कंटकाकडुन दिल्या जातात.
शाळेच्या आवारातच छेडछाड
काही तरूण दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. यातुन मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे. किरकोळ भांडणाला मोठी गर्दी जमा करुन मोठे रुप देण्याचा प्रयत्न केला जातो. तोच प्रकार सायंकाळी शाळा सुटतांना शाळेचा आवारात होतांना दिसतो. मुला मुलींच्या गर्दींत हेतुपुरस्कर धक्का लावण्याचा प्रकार केला जातो. शहरातील विविध माध्यमिक विद्यालये व महाविद्यालयाचा ठिकाणी शाळा भरतांना व सुटतांना पोलिसांची गस्त ठेवावी. शालेय प्रशासनामार्फत सातत्याने पोलीस प्रशासनाकडे मागणी केली जात आहे. गेल्या एक वर्षांपूर्वी पोलीसांना ड्युट्या लावल्या होत्या. आता त्या बंद झाल्या आहेत. समाज कंटकांनी शाळा व महाविद्यालय लक्ष केली आहेत. शालेय प्रशासनाने वाढत्या छेडछाडीला पोलिस प्रशासनाने आवर घालण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.