कन्याकुमारी । सद्यस्थितीत शाळांमध्ये मुलांबाबत घडणार्या घटना पाहता, शाळा आता मुलांसाठी सुरक्षित राहिल्या नाहीत, अशी खंत नोबेल पुरस्कार विजेते सामाजिक कार्यकर्ते कैलाश सत्यर्थी यांनी व्यक्त केली. गुरुग्रामच्या रेयान इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणार्या सात वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण करून हत्या केली गेली. दिल्लीच्या टागोर पब्लिक स्कूलमध्येही शाळकरी मुलीवर बलात्कार झाला. तसेच देशभरातील इतर घटना पाहता शाळा मुलांसाठी असुरक्षित होत आहेत. मुलांना सुरक्षित वातावरण देण्यात अयशस्वी होत आहोत, असे मत कैलाश सत्यर्थी यांनी एका मुलाखतीत व्यक्त केले आहे.
ही बाब देशासाठी शरमेची
प्रत्येक मुलाला शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी मी कायम आग्रही भूमिका घेतली. कारण शाळा ही मुलांसाठी घरानंतर सर्वात सुरक्षित जागा असते. मात्र सध्या समोर येणार्या घटना असुरक्षिततेची भावना निर्माण करणार्या आहेत असेही सत्यर्थी म्हणाले. सध्या समोर येणार्या घटनांमुळे शिक्षणाबाबत आणि शिक्षण देणार्या संस्थांबाबत पालकांच्या मनात घृणा निर्माण झाली, ही बाब देशासाठी शरमेची आहे असेही सत्यर्थी यांनी स्पष्ट केले.
माझ्या भारत यात्रे दरम्यान मी एका बलात्कार पीडित मुलीला भेटलो. या मुलीवर शाळेतून घरी परतत असताना बलात्कार झाला होता. मी शाळेचे नाव घेताच, ती पीडित मुलगी थरथर कापू लागली. तसेच अस्वस्थही झाली, या मुलीचे आई वडीलही शाळेचे नाव काढताच अस्वस्थ झाले आणि ते त्यांच्या मुलीला शाळेत पाठवायला तयार नाहीत. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याची सुरक्षा ही त्या त्या शाळेची नैतिक जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर शाळा प्रशासनाने सर्वाधिक भर दिला पाहिजे, मात्र आपल्या देशात असे होताना दिसत नाही. प्रत्येक विद्यार्थी घरुन शाळेत येईपर्यंत आणि शाळेतून घरी पोहचेपर्यंत त्याची सुरक्षा हा महत्त्वाचा निकष शाळेने जपला पाहिजे असेही मत सत्यर्थी यांनी व्यक्त केले.