शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची विधानसभेत घोषणा
विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालकांना मिळाला दिलासा
मुंबई :- शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी 30 एप्रिलपर्यंत शाळा सुरु ठेवण्याचा निर्णय मागे घेतला आहे.सगळीकडून टीकेची झोड उठल्यानंतर तावडेंनी विधीमंडळात याबाबतची घोषणा केली. 30 एप्रिलपर्यंत शाळा सुरु ठेवण्याचा निर्णय मागे घेतला आहे. अधिकाऱ्यांना बोलवून त्याबाबतची सूचना देऊ”, असे तावडे यावेळी म्हणाले. मार्चमध्ये परीक्षा झाल्यावरही ३० एप्रिलपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. तो निर्णय अखेर मागे घेण्यात आला आहे. यामुळे पालक शिक्षकांसह मुलांनाही दिलासा मिळाला आहे.
शिक्षण विभागाच्या या निर्णयावर पालकांसहित शिक्षकांकडूनही टीका होत होती. हा निर्णय केंद्र सरकारच्या आदेशानंतर घेण्यात आला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. आवश्यकता भासली तर पुढील शैक्षणिक वर्षात हा निर्णय लागू करू, असेही तावडेंनी सांगितले. परीक्षा संपल्यावर गावाला जाण्यासाठी आतुर झालेले विद्यार्थी आणि बस-रेल्वेमधील तिकिटांचे आरक्षण करून प्रवासाची आखणी केलेल्या पालकांना शिक्षण विभागाने धक्का दिला होता.
दरवर्षी परीक्षा संपली की दुसऱ्या दिवसांपासून उन्हाळी सुट्टी सुरू होते. दहावीची परीक्षा झाली की शाळेच्या परीक्षा आणि त्यानंतर साधारण मार्च अखेर किंवा एप्रिलमध्ये मुलांना सुट्टी असते. एप्रिल अखेर किंवा १ मे ला निकाल लागल्यानंतर महिनाभर शिक्षकांनाही सुट्टी असे शाळेचे आतापर्यंतचे वार्षिक वेळापत्रक होते. मात्र हे वेळापत्रकच बदलण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. पहिली ते नववीच्या सरकारी शाळा १ मे पर्यंत सुरू ठेवाव्यात, असे आदेश विद्या प्राधिकारणाने दिले होते. या कालावधीत मुलांसाठी उपक्रम, उन्हाळी शिबिरे आयोजित करावित, अशाही सूचना देण्यात आल्या होत्या.