भुसावळ – ज्या शाळेने व शिक्षकांनी घडवून माझ्या आयुष्यात शिक्षण रूजविण्याचे काम करून माझ्या जीवनाला आकार देण्याचे काम केले अशा शाळेचा शिक्षण सभापती झाल्याचा आनंद अवर्णनीय असल्याचे प्रतिपादन अॅड.बोधराज चौधरी यांनी येथे केले. भुसावळ येथील द.शि.विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. अॅड.चौधरी म्हणाले की, भुसावळ नगरपालिका शाळा व शिक्षकांची गुणवत्ता आजही कौतुकास्पद आहे परंतु पालकांच्या बदललेल्या मानसिकतेमुळे आज विद्यार्थी संख्या पूर्वीइतकी नाही. शिक्षण सभापतीपदी निवड झाल्यानंतर प्रथमच त्यांचे द.शि. विद्यालयात आगमन झाले. त्यानिमित्त त्यांचा मुख्याध्यापक जे.बी.राणे यांनी सत्कार केला. मुख्याध्यापक जे.बी.राणे म्हणाले की, शाळेचा माजी विद्यार्थी शिक्षण सभापती झाल्याची बाब आपल्या सर्व शिक्षकांसाठी अभिमानास्पद आहे. शाळेच्या भौतिक सुविधेसाठी पालिकेकडून सहकार्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.