ठाणे । रानावनातल्या आश्रमशाळांच्या शिक्षकांना अन् कर्मचार्यांना शाळांच्या वेळा ठरवण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ याची याची शिक्षण विभागाला आणि आदिवासी खात्याला लाज का वाटत नाही, असा खडा सवाल ज्येष्ठ पत्रकार कैलाश म्हापदी यांनी आश्रमशाळांच्या आंदोलनात शासनाला केला. वागळे इस्टेट येथील आदिवासी अपर आयुक्त कार्यालयासमोर आश्रमशाळा, आदिवासी कर्मचारी संघटनेने निदर्शने केली. या वेळी आंदोलकांना संबोधित करताना म्हापदी यांनी शासनाच्या आश्रमशाळा धोरणातील विसंगती दाखवून दिल्या.
अधीक्षकच वस्तीला नसतात
अनेक वर्षे 11 ते 5 ही शाळांची वेळ आहे. मात्र काही सरकारी बाबूंनी विनाकारण वेळा बदलल्या आहेत. त्यांचा संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवरच ताण पडत असून मुलांची जेवणंही व्यवस्थित होत नाहीत. पहाटे उठून मुलांना आंघोळीसाठी चाचपडावे लागते. अनेक शाळांमध्ये अधिक्षकच वस्तीला नसतात. अशा अनेक मागण्यांचा पाढा यावेळी आंदोलकांनी वाचला. आपले आंदोलन सरकारविरोधी नाही मात्र सरकारने अधिकार्यांना आवरावे, असा इशाराही आंदोलकांनी दिला.