शाळेच्या आवारात अत्याचार करणार्‍यास तत्काळ अटक करा

0

दोंडाईचा । येथे बालिकेवर शाळेच्या आवारात अत्याचार करणार्‍या नराधमाला तत्काळ अटक करुन या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करीत धुळे महानगर तिळवण तेली समाजाच्या महिला मंडळाने जिल्हाधिकार्‍यांना आज निवेदन दिले. यावेळी माजी महापौर जयर्श्री कमलाकर अहिरराव यांच्यासह महिला उपस्थित होत्या. 8 फेब्रुवारी रोजी दोंडाईचा येथील ज्ञानोपासक संस्थेच्या नुतन विद्यालय शाळेच्या आवारात बालिवाडीच्या 5 वर्षीय बालिकेवर अज्ञात नराधमाने अतिप्रसंग करीत तीला मारहाण केली. झाल्या प्रकारावर त्वरीत कारवाई करुन आरोपीस पकडून देण्याऐवजी शाळा चालकांनी, शिक्षकांनी मुलीच्या आई वडीलांना तक्रार न करण्याचे बजावले. पोलिसात गेला तर तुमची समाजात बदनामी होईल असे सांगून हा घु्रणास्पद प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला.

संस्थाचालकांची चौकशी करा
समाजाला काळीमा फासणारी ही घटना असल्याने तेली समाज याविरुध्द तिव्र आंदोलनाच्या तयारीत आहे. त्यामुळे लवकरात लवकर संस्थाचालक यांची चौकशी करावी. अत्याचार करणार्‍या नराधमास अटक करुन त्यास पाठीशी घालणार्‍या लोकांना अटक करुन कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि या प्रकरणाचा तपास महिला आपीएस अधिकार्‍याच्या हातात सोपवावा अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना देण्यात आले. यावेळी माजी महापौर जयश्री अहिरराव यांच्यासह नगरसेविका प्रतिभा चौधरी, महिला मंडळाच्या अध्यक्षा सुलोचना चौधरी, नगरसेविका प्रभावती राजेंद्र चौधरी, नगरसेविका मनिषा सतिष महाले, वैभवी अमित दुसाणे, विजया चौधरी, सुवर्णा कन्हैय्या महाले, रंजना चौधरी, भारती अनिल अहिरराव, प्रियंका अमोल चौधरी, प्रतिभा संजय ठाकरे आदी महिला उपस्थित होत्या.