शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांचे फुल-चॉकलेट देऊन स्वागत!

0

जळगाव। उन्हाळ्याच्या दिर्घ सुट्यांनंतर आज शाळा सुरू झाली. विद्यार्थ्यांचा दिवस छान जावा, दिवसाची सुरूवात गोड व्हावी आणि मुलांना शाळेत यायची गोडी लागावी यासाठी अनेक शाळांनी आज मुलांना फुलं आणि चॉकलेट देऊन त्यांचं स्वागत केले. शाळेतील विद्यार्थी, मुख्यध्यापक अगदी सगळ्यांनीच मुलांच्या स्वागतासाठी शाळेत तयारी केली होती. आजपासून पुन्हा एकदा शाळेत विद्यार्थ्यांचा गजबजाट सुरू झाला आहे. आकाशाला कवेत घेण्याची स्वप्ने घेऊन कुतूहूल, उत्सहुकता, काहीशी भिती अशा विविधांगी भावना मनात घेऊन चिमुल्या विद्यार्थ्यांची पावले दिर्घसुटीनंतर शाळेकडे वळाली. विशेष म्हणजे नवीन इयत्ता, नवीन युनिफॉर्म, नवीन पुस्तकं यामुळे विद्यार्थीसुद्धा शाळेत जायला उत्सुक दिसत होते.

लाठी विद्यालय
ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी संचलित भा. का. लाठी प्राथमिक विद्यालयातील मुलांचं वाद्याच्या गजरात स्वागत फेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांचे औक्षण करून गुलाबपुष्प देऊन स्वागत शिक्षकांनी केलं. स्वागतानंतर सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्य पुस्तकांचे वितरण करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप लाठी, मानदसचिव मुकुंद लाठी, ज्येष्ठ सदस्य घनश्याम लाठी, व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अ‍ॅड. सी.आर. पाटील तसेच पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष विलास नारखेडे, न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य योगेश चौधरी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन उपशिक्षीका प्रिती जावळे यांनी केले. आभार मृणालीनी कोळी यांनी मानले. यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी कामकाज पहिले.

जि.प.शाळा मोहाडी
मोहाडी येथील जि. प. प्राथमिक शाळेत सकाळी 7.30 वाजता गावातून ढोल ताशांच्या गजरात प्रभात फेरी काढण्यात आली. जिप समाजकल्याण सभापती प्रभाकर गोटू सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महिला व बाल कल्याण सभापती लिलाताई भिलाभाऊ सोनवणे ह्या उपस्थित होत्या. सरंपच शोभा सोनवणे, पोलीस पाटील शरद सोनवणे, ग्रा.पं. सदस्य गबाजी गवळी, यशवंत बाविस्कर, रामसिंग चव्हाण, सुभाष सोनवणे, बाबुलाल राठोड आदी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आले. तर शालेय पोषण आहारांतर्गत शिरा वाटप करून विद्यार्थ्यांचे तोंड गोड करण्यात आले. प्रास्तविक मुख्याध्यापक गणेश बागुल यांनी केले.

आर.आर.माध्यमिक विद्यालय
ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी संचलित आर. आर. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरूवातीस बँडच्या तालावर वाजत गाजत विद्यार्थ्यांचे प्रेवशद्वारापासून रांगेत त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक डी.एस. सरोदे, उपमुख्यध्यापिका विजया काबरा, पर्यवेक्षक एस. बी. अत्तरदे, शिक्षक आर. एम. झवर आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते 5 वी ते 8 वीतील विद्यार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्तविक व सूत्रसंचालन क्रिडा विभाग प्रमुख जयांशु पोळ यांनी केले. विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

सिध्दीविनायक विद्यालय
येथील जुन्या औद्यागिक वसाहतमधील सिद्धी विनायक प्राथमिक माध्यमिक विद्यालयात आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते पुस्तकांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी नगरसेविका लता चंद्रकांत सोनवणे, इश्‍वर पाटील, संतोष इंगळे, बाळाभाऊ सोनवणे, मुख्याध्यापक आर. पी. खोपडे आदी उपस्थित होते. आमदार सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे सुक्ष्म नियोजन करून शैक्षणिक गुणवत्ता वाढवून उज्वल भविष्य घडवावे असे आवाहन केले.