जळगाव। उन्हाळी सुटीनंतर जिल्ह्यातील शाळा 15 जून पासून सुरु होत आहे. शाळेचा पहिला दिवश विविध उपक्रम राबविण्याचे शालेय शिक्षण विभागाने ठरविले आहे. शाळेच्या पहिल्या दिवसापासून शैक्षणिक वातावरण निर्मितीसाठी व प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत दिलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे धोरण शालेय शिक्षण विभागाने आखले आहे. देशात स्वच्छ भारत अभियान हे शासनाचा मुख्य प्रवाहातील उपक्रम असून पहिल्या दिवशी विद्यार्थी शैक्षणिक दिंडी काढून विद्यार्थी शौचालयाचे महत्व, वृक्षलागवडीचे महत्व नागरिकांना पटवुन देणार आहे. शाळा प्रवेश सोहळा विविध कार्यक्रमांनी होणार आहे. लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत शाळा प्रवेश कार्यक्रम घेण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले असून मुख्यकार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी हे देखील शाळांना भेट देणार आहे. विविध उपक्रमांची अमंलबजावणी करुन उद्दिष्ट पूर्ततेसाठी सर्व शिक्षक व क्षेत्रीय अधिकारी यांनी प्रयत्न करावे असे शिक्षण विभागातर्फे कळविण्यात आले आहे. यासंदर्भातील कामकाजांची माहिती घेण्याकरीता मुख्यकार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर आढावा बैठक घेणार आहे.
वर्षभरातील उपक्रम
शासनाने जिल्ह्यात 2017-19 या तीन वर्षाच्या कालावधीत 50 कोटी वृक्ष लागवड करण्याचे ठरविल असून शिक्षण क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी, तसेच सर्व व्यवस्थापन सदस्य व विद्यार्थ्यांनी एक झाड लावण्याचे उपक्रम राबवावे, शंभर टक्के पटनोंदणीसाठी, शाळेच्या पहिल्या दिवशी शंभर टक्के विद्यार्थी व शिक्षकांची उपस्थिती रहावी यासाठी प्रयत्न करण्याचे सुचविण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी शालेय शिक्षण विभागासाठी की रिझल्ट एरिया दिले शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करून 10 वी पर्यत मुलींच्या गळतीचे प्रमाण 5 टक्केहुन खाली आणणे हे मुख्य उद्दिष्ट आहे.
लोकसहभागातून शाळा विकास
जिल्ह्यातील मागील वर्षामध्ये लोकसहभागातुन 1 कोटी 50 लाख 36 हजार 259 इतका निधी शालेय गुणवत्ता वाढीसाठी व विविध सोई सुविधांच्या पुर्ततेसाठी रोख प्राप्त झाले होते. या शैक्षणिक वर्षात शंभर टक्के शाळा डिजीटल करण्याठी तसेच आरटीई नुसार विविध मानके व निकषांच्या पुर्ततेसाठी जास्तीत जास्त लोकसहभागाची आवश्यकता आहे. यासाठी शिक्षकांनी प्रेरणासभा घेऊन शालेय विकासासाठी लोकसहभागातुन निधी उभारण्यासाठी प्रयत्न करावे.
पुस्तकाचे वाटप होणार
सर्व शिक्षा अभियानांतर्गत अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकाचे वाटप करण्यात येत आहे. जिल्ह्यात यावर्षी 1 ली ते 8 वी च्या वर्गासाठी 26 लाख 82 हजार 353 पुस्तकांची मागणी आहे. सर्व पुस्तकांचा पुरवठा करण्यात आला असून शाळा सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी पुस्ताकाचे वाटप करण्यात येणार आहे. बालभारती नाशिक मंडळातर्फे जिल्ह्यात पुस्तकाचे वितरण करण्यात येत आहे. मंडळाकडून थेट तालुकास्तरावर पुस्तकांचे वितरण केले जात आहे. गणवेशाचे रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे.