नंदुरबार:कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्या अनुषंगाने शालेय पोषण आहार योजना सुरू असलेल्या विविध शाळांमध्ये पडून असलेला दाळ तांदूळ या धान्यादी मालाचा साठा शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी याबाबतचे आदेश नुकतेच पारित केले आहेत.
संपूर्ण देशात कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर साथ रोग प्रतिबंधक कायद्यांतर्गत 15 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. या दरम्यान सर्वोच्च न्यायालयात सुमोटो रिट याचिकेद्वारे विविध शाळांमध्ये पडून असलेले धान्यादी साहित्य विद्यार्थ्यांना वाटप करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने शासनाने शालेय पोषण आहार योजनेचे तांदूळ व डाळी हे साहित्य वाटप करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातील शालेय पोषण आहार योजना सुरू असलेल्या सर्व शाळांमध्येही मार्च व एप्रिल महिन्याचे शालेय पोषण आहार योजनेचे दाळ व तांदूळ हे साहित्यपडून आहे.