शाळेत जेवण करतांना चक्कर येवून पडलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू

0

अभिनव विद्यालयातील प्रकार ; शाळा प्रशासनाने खुलासा करण्याची नातेवाईकांची मागणी

जळगाव : शाळेत जेवण करतांना अचानक भोवळ येवून पडलेल्या दहावीचा विद्यार्थी ओम नारायण कोळी (16) दिनकरनगर आसोदा रोड याचा मृत्यू झाल्याची घटना शहरातील अभिनव शाळेत अडीच वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान याप्रकरणी शाळा प्रशासनाने खुलासा करावा असे मागणी ओम याचे काका सुनील कोळी यांनी केली.

ओम हा अभिनव शाळेत दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तो नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता. अडीच वाजेच्या सुमारास मधली सुटी झाल्याने विद्यार्थी वर्गातून जेवणाचा डबा घेऊन बाहेर जात होते. तर ओम हा बेंचवरच जेवणासाठी बसला काही विद्यार्थ्यांनी ही माहिती शिक्षक व कर्मचार्‍यांना दिली. त्यानंतर शिक्षक व विद्यार्थ्यांनी तत्काळ ओम याला वर्गातून बाहेर आणले नंतर प्राचार्या सरोज तिवारी, तसेच वर्गशिक्षीका अश्विनी साळुंखे यांच्यासह विद्यार्थी शिक्षकांनी ओम याला उचलून जवळच असलेल्या डॉ.नीलेश शिंपी यांच्या हॉस्पिटलमध्ये हलविले. शिक्षिका अश्विनी साळुंखे यांनी ओम याच्या कुटुंबीयांना फोन करून ही माहिती कळविली. हॉस्पिटलमधून नंतर ओम याला जिल्हा शासकीय रूग्णालयात हलविले असता वैद्यकीय तपासणी करून डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.

वडिल नारायण कोळी हे मालवाहू गाडी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ते मुळ जवखेडा (धरणगाव ) येथील आहेत. त्यांचा लहान मुलगा यश (14) हा इयत्ता पाचवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. शिक्षण घेऊन मी नोकरीला लागेल, असे ओम नेहमी आई वडिलांना सांगत होता. त्याच्या या गोष्टींना आई वडिल उजाळा देऊन हंबरडा फोडत होते. जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस उपनिरीक्षक नरेश सपकाळे तसेच पोलीस नाईक प्रवीण भोसले यांनी पंचनामा केला असून मयताचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे.