शाळेत रंगली चिमुकल्यांची मंगळागौर!

0

मुंबई: घाटकोपर पूर्व पंतनगर येथील शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे मंगळवारी शाळेच्या सभागृहात शालेय विद्यार्थींनींची आगळीवेगळी मंगळागौर रंगली. मंगळागौरीचे विधिवत पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. मंगळागौरीची पूजा ही अन्नपूर्ण देवीचीच पूजा. आजही या पूजेचे महत्त्व कायम आहे. म्हणूनच श्रावणातील धमाल आणि जल्लोषाबरोबरच मंगळागौरीचाही आनंद लुटण्याची संधी घेऊन नर्सरी ते नववी पर्यंतच्या लहान लहान मुलींनी झिम्मा, फुगडी, बसफुगडी, पिंगा, कोंबडा, रिंगण (जाते, मुसळ, रहाट इत्यादींसह) आदी पारंपारिक नृत्यप्रकार सादर करुन कार्यक्रमात धमाल उडवली.

मराठीसह इंग्रजी माध्यमाच्या पूर्वप्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विभागातील 200 हून अधिक विद्यार्थीनीनी मंगळागौरीच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषात त्यांनी उपस्थितांना मंगळागौरीसंदर्भात माहिती देऊन उखाने, कोडी व म्हणीतून त्यांनी मराठमोळ्या संस्कृती व परंपरेचे दर्शन घडविले. 3-4 वर्षांच्या छोट्या विद्यार्थींनींच्या नृत्यरुपी कसरती आणि अभिनयाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटाने उदंड प्रतिसाद दिला