शाळेला क्रीडांगण नसतांना लाटले हजारो रुपयांचे अनुदान

0

फैजपूर। येथील मिल्लत नगमधील फैजपूर एज्युकेशन सोसायटी संचलित फातेमा उर्दू गर्ल्स हायस्कुल व प्राथमिक खाजगी शाळेच्या मुख्याध्यापक व संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी नगरपरिषद व शिक्षण विभागाची दिशाभुल करुन व खोटे कागदपत्र सादर करुन शाळेला क्रीडांगण नसतांना हजारो रुपयांचे अनुदान लाटल्याचा प्रकार माहिती अधिकार कायद्यांतर्गत मिळालेल्या कागदपत्रांवरुन उघडकीस आला आहे. मात्र वरिष्ठांपर्यंत ही बाब तक्रार अर्जाद्वारे करुन सुध्दा कोणतीही कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

तक्रारदाराला लेखी उत्तर
28 जानेवारी 2017 रोजी जावक क्रमांक 33/2016-17 नुसार फातेमा उर्दू गर्ल्स हायस्कुल व उर्दू प्राथमिक (खाजगी) या एकाच इमारतीत भरत असलेल्या दोन्ही शाळांच्या मुख्याध्यापकांनी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती यावल यांना दिलेल्या लेखी पत्रात तक्रारदार मोेहम्मद सादिक शेख हसन यांच्या पत्राला उत्तर दिले.

शिक्षणाधिकार्‍यांकडे खुलासा
त्या पत्रात विद्यार्थीनींना शाळा इमारतसमोर सुमारे 6 हजार चौ.फु.ची मोकळी जागा खेळण्यासाठी नगरपालिकेकडून मिळालेेली असल्याचे नमूद केले आहे. मात्र प्रत्यक्षात ही गटशिक्षणाधिकार्‍यांची दिशाभुल केली असून शाळेेच्या इमारतीसमोर उत्तर-दक्षिण 6 मिटरचा रस्ता आहे व त्यापुढे खाजगी प्लॉटधारक आहे. याबाबत गटशिक्षणाधिकार्‍यांनी प्रत्यक्ष शाळेला भेट देवून पाहणी केली असता शाळेत अनेक गैरसोयी असून शाळेला क्रीडांगण नसल्याचा लेखी खुलासा शिक्षणाधिकारी जळगाव यांना 20 सप्टेंबर 2016 रोजी दिलेल्या पत्रात केला आहे.

कारवाई करण्याची मागणी
असे असुनसुध्दा क्रीडा साहित्यावर बोगस बिले सादर करुन 1 लाख 29 हजार रुपये अनुदान सन 2011-12 ला घेेतलेले आहे. तसेच वॉल व तार कम्पाऊंडसाठी 48 हजार अनुदान घेतलेले आहे. मात्र आजही येथे शाळेची इमारत उघड्यावर उभी आहे. सात दिवसांच्या आत सदर बाबींची पुर्तता करण्याचे लेखी पत्र मुख्याध्यापकांनी देवून सुध्दा या घटनेला दिड ते दोन वर्षे कालावधी होवूनही संबंधितांवर वरिष्ठांनी कोणतीही कारवाई केली नाही. मुख्याध्यापक व संस्थेचे सचिव यांनी खोटी व दिशाभुल करणारी लेखी माहिती प्रशासनाला सादर करुनही प्रशासन अर्थपूर्ण कानाडोळा करीत असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते मोहम्मद सादिक शेख हसन यांनी केला आहे. वरिष्ठांनी गंभीर दखल घेत संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.