शाळेतील सामान हलविण्यास पालकांचा विरोध
चिंचवड : चिंचवड प्रेमलोक पार्क मधील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महात्मा ज्योतिबा फुले इंग्रजी माध्यमिक शाळेतील साहित्य दळवी नगर येथील शाळेत हलविण्यास पालकांनी विरोध केला आहे. पालक आणि विद्यार्थ्यांनी सलग दुसर्या दिवशी देखील शाळेसमोर ठिय्या मांडला आहे. नगरसेवक नामदेव ढाके यांनी पालकांशी संवाद साधला. दळवी नगर येथे शाळा सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी पालकांनी सहकार्य करावे. शाळेच्या गुणवत्तेत सुधारणा करणे, सुविधा उपलब्ध करणे आणि परिसराला सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. मात्र पालकांनी विरोध कायम ठेवला.
दळवीनगर असुरक्षित लोकवस्ती
पालक सुनील कांबळे म्हणाले, दळवी नगर येथील शाळेसमोर विद्युत रोहित्र (डीपी), बाजूला मोठा नाला, सार्वजनिक शौचालय, समोर रेल्वे रूळ आहे. तसेच ही लोकवस्ती असुरक्षित आहे. त्यामुळे ही शाळा दळवी नगर येथे स्थलांतरित केल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार आहे. प्रेमलोक पार्क हा परिसर शहराच्या मध्यवर्ती भागात आहे, याठिकाणी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला कोणतीही बाधा येणार नाही. त्यामुळे शाळा स्थलांतरित करू नये.