जळगाव । ज्या भागात मुबलक पाणी असेल तो भाग विकसित झालेला दिसून येतो. पाण्याच्या उपलब्धतेवर गावाचा विकास अवलंबून असल्याने गावांचा शाश्वत विकासासाठी पाण्याचा ताळेबंदाला महत्व दिले पाहिजे. असे प्रतिपादन कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांनी केले. मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने जलयुक्त शिवार अभियानातंर्गत जिल्हयातील निवडलेल्या गावांधील पाणलोट प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी जिल्हा अधिक्षक कृषि कार्यालय व कृषि विज्ञान केंद्र, पाल च्या वतीने पाचोरा येथील राजयोग मल्टीपर्पज हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘संवाद पर्व’ कार्यक्रमात भोकरे बोलत होते.
पाण्याचा प्रत्येक थेंब न थेंब जमिनीत जिरविला पाहिजे
याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, पाचोर्याचे उपविभागीय कृषी अधिकारी नारायणराव देशमुख, तालुका कृषि अधिकारी दिपक ठाकूर, भूजल सर्व्हेक्षण विभागाचे वरिष्ठ तंत्रज्ञ आर. जी. संकपाळ उपस्थित होते. यावेळी बोलतांना भोकरे म्हणाले की, आपल्या गावात व शेतात पडणार्या पाण्याचा प्रत्येक थेंब न थेंब जमिनीत जिरविला पाहिजे. जमिनीत जिरविलेल्या पाण्याचा किफायतशीर वापर होण्यासाठी पाण्याचा ताळेबंद आवश्यक आहे. कमी खर्चात जास्त पाणी मिळविण्यासाठी पाण्याच्या ताळेबंदाला महत्व दिले तर गावांच्या शाश्वत विकासाला निश्चितपणे मदत होईल. पाण्याच्या शाश्वत विकासाबरोबरच मनुष्याच्या आरोग्याचा व शिक्षणाचाही विकास होण्यासाठी गावपातळीवर अनेक योजना राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
संवाद साधला
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने शासनाच्या योजनांचा प्रसार व प्रचार होण्यासाठी संवाद पर्व हा उपक्रम राबविण्यात येत असून संवाद पर्व कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थितांशी संवाद साधताना जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियान हे राज्य शासनाचे महत्वाकांक्षी अभियान आहे. या अभियानाच्या माध्यमातून 2019 पर्यंत दुष्काळमुक्त महाराष्ट्राकडे वाटचाल सुरु असून आतापर्यंत जिल्हयातील 634 गावांमध्ये हे अभियान राबविण्यात येत आहे.