शाश्‍वत हागणदारी मुक्तीसाठी ‘जिल्हा स्वच्छतादर्पण’ उपक्रम

0

पुणेः पुणे जिल्हा हागणदारी मुक्त झाल्यानंतर आता शाश्‍वत हागणदारी मुक्तीसाठी जिल्हा स्वच्छता दर्पण उपक्रम हाती घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी दिली. 15 जुलैला हा उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषदेने 31 मार्च पूर्वी जिल्हा हागणदारी मुक्त झाल्याची घोषणा केली आहे़ मात्र ग्रामीण भागात नागरिकांना स्वच्छतागृहे नियमित वापरावीत तसेच स्वच्छतागृहांची चांगली देखरेख करावी, वेळोवेळी ती स्वच्छ करावीत यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्हा स्वच्छता दर्पण उपक्रम राबविण्यात येणार आहे.

गाव पातळीवर स्पर्धा
या उपक्रमाअंतर्गत गावांमध्ये शोषखड्डे घेणे, बायोगॅस प्रकल्प उभारणे, गावातील पडकी घरे अथवा खिंडारे असतील त्याठिकाणी राडारोडा पडला असेल तो स्वच्छ करण्यात येणारआहे. यामुळे नागरिकांना रोजगार निर्मिती होण्यास मदत होणार आहे. तसेच स्वच्छतेअंतर्गत जिल्हाभर गाव पातळीवर स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत.

इंदापूर तालुक्यात जनजागृती रॅली
जिल्ह्यात 6 लाख 23 हजार 626 कुटुंबे आहेत. त्यातील अनेक कुटुंबांकडे शौचालये नव्हती ती बांधण्यासाठी संबंधित कुटुंबांच्या घरोघरी जाऊन प्रबोधन, फ्लेक्सद्वारे जनजागृती, विद्यार्थ्यांकडून पालकांचे प्रबोधन आदी उपाययोजना राबविण्यात आल्या होत्या. शाळा आणि अनेक कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी गावा-गावांमध्ये स्वच्छता जनजागृती केलीहोती. विविध कंपन्यांनी शौचालये बांधण्यासाठी पुढाकार घेतला होता. विशेषत: इंदापूर तालुक्यात जनजागृती रॅली काढण्यात आली होती. प्रशासनाने नागरिकांचे प्रबोधन करून, प्रशासकीय दबाव टाकून शौचालय बांधण्याचे काम करून घेतले आहे. जिल्हा परिषदेतील सदस्यांमध्ये गट हागणदारीमुक्त करण्याची स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमुळे सदस्यांनी त्यांच्या गटामध्ये नागरिकांना आरोग्याचे महत्त्व पटवून दिले. काही गटातील सदस्यांनी गटातील नागरिकांना शौचालय बांधण्यासाठी अर्थसहाय्य केल्यामुळे जिल्हा हागणदारीमुक्त होण्यास मदत झाली. ती शाश्वत राहण्यासाठी जिल्हा स्वच्छत ादर्पण उपक्रम राबविण्यात आला आहे़