शासकीय अनुदान लाटल्याप्रकरणातील आरोपीला पोलीस कोठडी

जळगाव – शासकीय योजनेच्या अनुदानात 47 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणातील आरोपी दीपक
नीळकंठ जावळे याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने दीपक नीळकंठ जावळे (27, रा. नितीन साहित्यानगर, सुप्रीम कॉलनी) याला अटक केली. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अंतर्गत प्रमोद महाजन कौशल्य उद्योजक विकास अ भियान अंतर्गत शैक्षणिक संस्था सुरू करुन देण्यासाठी भूषण गणेश बक्षे (वय 27, रा. पार्वती काळेनगर, मोहाडी रोड ) याने भारती गजेंद्रसिंग परदेशी (रा.रायपूर) यांच्याकडून कागदपत्र घेऊन संस्थेची नोंदणी केली. या संस्थेला मिळणारे 47 लाख रुपयांचे शासकीय अनुदान परस्पर लाटून घेतले होते, अशी तक्रार भारती परदेशी यांनी दिली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात 1 फेब्रुवारी 2019 रोजी भूषण गणेश बक्षे, शीतल भगवान पाटील, भरत अरविंद भंगाळे, मोहिनी भरत भंगाळे, राजेंद्र नरेंद्र नारखेडे आणि भगवान दगडू पाटील यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. तपासाअंती दीपक नीळकंठ जावळे यालाही आरोपी करण्यात आले असून त्याला अटक झाली. न्यायालयात हजर केले असता, त्यास न्या. अक्षी जैन यांनी 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.