शहापूर । शासकीय अनुदानित आश्रमशाळा विद्यार्थ्यांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धां शहापूर तालुक्यातील मोहिली-अघई येथे आत्मा मालिक शैक्षणिक संकुल येथे या सुरू झाल्या आहेत. या स्पर्धेचा शुभारंभ आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा, आदिवासी विकास विभागच्या मुख्यप्र सचिव आदिवासी मनीषा वर्मा आणि आदिवासी विकास आयुक्त रामचंद्र कुलकर्णी, अप्पर आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या स्पर्धांमध्ये 890 मुले आणि 852 मुली असे 1 हजार 642 विद्यार्थी सहभागी झाले असून या राज्यस्तरीय स्पर्धामध्ये कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल हँडबॉल, धावणे, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक असे सांघिक व वैयक्तिक खेळ सुरू असून रविवारी बक्षीस वितरण होणार आहे.
शुभारंभ कार्यक्रमात आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा म्हणाले की, खेळाला महत्त्व देणे आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुण असतात त्यांना संधी मिळाली की ते चमकतात. आदिवासी विद्यार्थ्यांचे इंग्रजी सुधारण्यासाठी आदिवासी विकास विभागाने एका संस्थेची नियुक्ती केली आहे. तसेच खेळासाठीचे 25 गुण आणि नोकरीत आरक्षण देखील देण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. राज्यात आदिवासींची 491 वसतिगृहे असून त्यात वाढ करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.