फैजपूर। इंटरनेटचे जाळे संपूर्ण जगभरात पसरले असून गावागावात प्रत्येकाच्या हातात आता इंटरनेट असलेल्या मोबाईल उपलब्ध झाला आहे. त्यात शासकीय कर्मचारी मागे कसे असतील. शासकीय सेवा गतीमान करण्यासाठी तसेच नागरिकांना कमी वेळेत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व कार्यालयांमध्ये इंटरनेट जोडण्यात आले. सेवा ऑनलाईन झाल्याने शासकीय कार्यालयांमध्ये इंटरनेट सुविधा मिळाली आहे. पण या सुविधांच्या आड बहुतेक कार्यालयातील कर्मचारी सोशल मीडिया आणि गेम्स खेळण्यात व्यस्त असल्याने चित्र फैजपूर शहरातील काही शासकीय कार्यालयात दिसून आले.
डिजीटल इंडियाचे फायदे, मात्र दुष्परिणामही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडीया असा नारा दिला आहे. पूर्वी सर्व शासकीय कामे कागदपत्री म्हणजेच ऑफलाईन केली जात होती. त्यामुळे शासकीय कामकाज कासवगतीने व्हायची पण मागील काही वर्षात ही कामे अधिक गतिमान करण्यासाठी सर्व शासकीय कार्यालये ही संगणकीकृत करण्यात आली आहे. कामे ऑनलाईन पद्धतीने होत असल्याने कार्यालयांमध्ये इंटरनेट जाळे तयार करण्यात आले. त्यामुळे कामे अधिक गतिमान होऊन ती सोपी झाली. मात्र याचे दुष्परिणामही पहावयास मिळत आहेत.
कामादरम्यान करावी बंदी
नवीन कर्मचारी हे नव्या पिढीतील असल्यामुळे तंत्रज्ञान कौशल्य लगेच आत्मसात करतात त्यामुळे कामाचा वेग वाढला आहे. तसेच आता कोणत्याही शासकीय पदभरतीत संगणक कौशल्य ही अटही प्रामुख्याने घालण्यात आली आहे. पण याच काही वर्षात सोशल मीडियाची नवनवी माध्यमे उदयास आली आहे. यामध्ये फेसबुक, व्हॉटस अॅप आदी माध्यमांचा बोलबाला आहे. युवा पिढीसह वयोवृद्ध मंडळीही या माध्यमानापासून दूर राहिले नाही. ही माध्यमे वापरण्यावर कुणाचेही बंधन नाही. परंतु कार्यालयात कामासाठी मिळालेल्या संगणकाचा व इंटरनेट सुविधा फेसबुक सर्फिंगसाठी वापर या काही दिवसांमध्ये वाढला आहे.
वरिष्ठांनी लक्ष द्यावे
अनेक कार्यालयामध्ये कागदोपत्री व्यवहार हे ई-मेलच्या माध्यमातून होतात. त्यामुळे ती सुविधा वापरणे अनिवार्य आहेत. पण या सोबत वेळात-वेळ काढून किंवा कामाच्या वेळातही कामे बाजूला ठेऊन संगणकावर फेसबुक सर्फिंग करणारी अनेक मंडळी शासकीय कार्यालयामध्ये दिसून आली आहेत. याचा विपरीत परिणाम कामावर होत आहे. अनेक जण कार्यालयात आल्याबरोबर तास-दोन तास फेसबुकवर रममाण झालेले असतात. वरिष्ठांनी लक्ष देत कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.