शासकीय कामकाजात अडथळा ः 7 जुलै रोजी होणार सुनावणी

0

माजी आमदार संतोष चौधरींसह जनाधारच्या नगरसेवकांना नोटीस

भुसावळ- पालिका कामकाजात हस्तक्षेप केल्याप्रकरणी दाखल तक्रारीनंतर 7 जुलै रोजी प्रांताधिकार्‍यांकडे सुनावणी होणार असून या संदर्भात माजी आमदार संतोष चौधरींसह जनाधारचे गटनेते उल्हास पगारे व अन्य नगरसेवकांना नोटीस बजावण्यात आली आहे. संबंधित पालिकेच्या कामकाजात हस्तक्षेप करुन शासकीय योजना राबवताना अडथळा निर्माण करतात, अशी तक्रार तत्कालीन मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती. यानुसार माजी आमदार चौधरींसह जनआधारच्या 9 नगरसेवकांना नोटीस बजावण्यात आल्यानंतर 7 रोजी प्रांतांकडे उभयंतांचे जाबजवाब नोंदवण्यात येणार आहेत.

हस्तक्षेपामुळे कामकाजावर होतो परीणाम
तत्कालीन मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांनी, गटनेते उल्हास पगारे, माजी आमदार संतोष चौधरी हे भुसावळ पालिकेच्या कामकाजात हस्तक्षेप करुन कर्मचार्‍यांना धाक दाखवून कामे करण्यापासून मज्जाव करतात. पालिकेचे दैनंदिन कामकाज, शासकीय योजना राबवताना वारंवार अडथळे आणतात. यामुळे कर्मचार्‍यांच्या मानसिकतेवर विपरित परिणाम होत असल्याची तक्रार केली होती. हा तक्रार अर्ज प्रांताधिकारी डॉ.श्रीकुमार चिंचकर यांच्याकडे चौकशीसाठी आला आहे. प्रांताधिकार्‍यांनी अर्जदार बाविस्कर, प्रभारी रोखपाल दिनेश अहिरे, प्रभारी रोखपाल अख्तर खान, लिपिक सतीश बेदरकर यांच्यासह माजी आमदार संतोष चौधरी, गटनेता उल्हास पगारे, नगरसेवक दुर्गेश ठाकूर, सचिन संतोष चौधरी, केदार सानप, नगरसेवक रवी सपकाळे, सिकंदर खान, नगरसेवक संतोष (दाढी) चौधरी, राहुल कैलास बोरसे आदींना नोटीस बजावली आहे. त्यात 7 जुलैला सकाळी 11 वाजता कागदपत्रांसह उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आली आहे.